बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील एका शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलगी मध्यरात्री रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली आहे. रविवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. मुलीच्या पालकांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार फिर्यादी या वणीतील एका भागातील रहिवासी आहे. त्यांची एक मुलगी (वय 15) ही वणीतील एका शाळेत 10 वीमध्ये शिक्षण घेत आहे. दिनांक 02 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजता संपूर्ण कुटुंब जेवण करून झोपले होते. मात्र, 03 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 1 वाजता आईला जाग आल्यावर त्यांनी मुलगी रूममध्ये नसल्याचे पाहिले. घरात तसेच परिसरात शोध घेतला, पण मुलगी कुठेही आढळून आली नाही.
फुस लावून पळवून नेल्याचा संशय
मध्यरात्री नळ येत असल्याने फिर्यादीची सासू पाणी भरत होत्या. त्यांना वाटले मुलगी पाणी भरण्यासाठी सासूला मदत करीत असेल. त्यामुळे त्यांनी सासूला मुलीबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी मुलीला पाहिले नसल्याचे सांगितले. त्यांची मुलगी पूर्वी कधीही घरातून न सांगता बाहेर गेली नव्हती. त्यामुळे पालकांनी अज्ञात व्यक्तीने तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे.
मुलीच्या आईने वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात बीएनएसच्या कलम 137(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
प्रभाग क्र. 4 मधून होतकरू तरुण दिगांबर उर्फ वसंत गायकवाड सज्ज !





Comments are closed.