मोमिनपु-यात गोवंश कत्तलीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश, दोघे जेरबंद

वणी पोलिसांची धडक कारवाई, 16 हजारांच्या गोमांसासह 33 हजारांचा मुद्देमाल जप्त

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिसांनी शहरातील मोमिनपुरा भागात केलेल्या विशेष धडक कारवाईत अवैध गोवंश कत्तल व मांस विक्रीचा मोठा पर्दाफाश केला. 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी झालेल्या या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून अंदाजे 70 ते 80 किलो गोमांसासह 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, मोमिनपुरा येथील मोहम्मद एजाज अब्दूल अजीज कूरेशी यांच्या घरात अवैधरित्या गोवंश कत्तल व मांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश अपसुंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी 11 वाजता छापा टाकण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

छाप्यात मोहम्मद एजाज अब्दूल अजीज कूरेशी (वय 57) व मोहम्मद कैसर मोहम्मद अजीज कूरेशी (वय 42) हे दोघे रंगेहाथ पकडले गेले. पोलिसांनी घरातून 70 ते 80 किलो गोमांस (16 हजार), धारदार सत्तूर, वजन काटे, खिमा मशीन व इतर साहित्य असा एकूण 33 हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोमांसाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी घेतले असून नाशवंत मांस पंचासमक्ष नष्ट करण्यात येणार आहे. आरोपींविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास ना.पो.का. विशाल राठोड करीत आहेत. शहरात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. (इमेज एआय जनरेटेड)

ज्येष्ठ पत्रकार रवि ढुमणे यांची गळफास घेऊन आत्महत्या

Comments are closed.