बहुगुणी डेस्क, वणी: लग्नसमारंभात जुन्या वादातून तिघांनी मिळून एकाला मारहाण करत चाकूने हल्ला केला. ही घटना 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील चोपण येथील एका मंदिरात घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, निलेश अन्नाजी काथवडे (वय 37, रा. चोपन, ता. मारेगाव) हे रोजमजुरीचे काम करतात. त्यांचा शेजारी असलेले नागोराव रामचंद्र दुमने यांच्यासोबत त्यांचा शेतात ये-जा करण्याच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू आहे. शुक्रवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी निलेश हे गावातील गंगाराम मंदिरात एका लग्न कार्यासाठी गेले होते.
लग्नात जेवण करत असताना आरोपी नागोराव रामचंद्र ढुमने (वय 45), अशिष नागोराव ढुमने (वय 25) व अमोल नागोराव ढुमने (वय 27) हे तेथे आले. अशिष व अमोल यांनी निलेशला हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर नागोराव ढुमने हा घरी जाऊन कांदे कापण्याचा चाकू घेऊन परत आला व त्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले.
भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीची पत्नी मध्ये आली असता आरोपी नागोराव याने तिला धक्काबुक्की करून बाजूला ढकलले. लग्नसमारंभात उपस्थित नागरिक व फिर्यादीच्या नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी अवस्थेत फिर्यादीने मारेगाव पोलीस ठाण्यात हजर राहून जबानी तक्रार दिली.
या प्रकरणी पोलीस हवालदार प्रीती पोयाम यांनी गुन्हा नोंदवून घेतला असून सहाय्यक उपनिरीक्षक दिगंबर किनाके पुढील तपास करीत आहेत. फिर्यादीचा जबानी रिपोर्ट व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे तिन्ही आरोपींविरुद्ध BNS कलम 118(1), 115(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ईमेज एआय जनरेडेट)



Comments are closed.