शेतकऱ्यांचा राग कधी उफाळणार? — बच्चू कडूंचा सवाल
वणीतील शेतकरी महाएल्गार मेळाव्यात सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला
विवेक तोटेवार, वणी : वणी येथील शासकीय मैदानावर रविवारी, दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी शेतकरी महाएल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी आमदार व शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांना थेट सवाल करत त्यांनी विचारले — “संताप कधी येईल? शेतकऱ्यांचा राग कधी उफाळून येणार?”
कडू म्हणाले की, लढल्याशिवाय काहीही मिळत नाही. शेतकऱ्यांनी आता पेटून उठण्याची वेळ आली असून सरकारला त्यांच्या धोरणांचा जाब विचारला पाहिजे. हमीभावाच्या मागणीसाठी येत्या 19 फेब्रुवारीपासून 15 दिवसांची पदयात्रा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

कर्जमाफीबाबत सरकारने 30 जूनपर्यंतची मुदत दिल्याचे सांगत कडू यांनी इशारा दिला — “1 जुलैपर्यंत कर्जमाफी झाली नाही, तर राज्यातील एकही रेल्वेचा चाक फिरू देणार नाही.”
सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेवर प्रकाश टाकला. उत्पादन खर्च वाढला, पण शेतमालाला भाव नाही; निसर्गाचा लहरीपणा, तुटपुंजी मदत आणि वाढता कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्येकडे ढकलला जात आहे. एवढेच नाही तर कर्जफेडीसाठी शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. “आत्महत्या करून लाचारीचं मरण पत्करण्यापेक्षा आपल्या हक्कांसाठी मैदानात उतरून लढलं पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
कडू यांनी पक्ष-जातपात बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले. “शेतकरी आपल्या हक्कांसाठी सरकारविरुद्ध एकीनं उभा राहिला तर मी सदैव त्यांच्या आवाजासाठी मैदानात असेन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या मेळाव्यास माजी आमदार वामनराव चटप यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते. चटप यांनी सरकारच्या कर्जबाजारीपणाची आकडेवारी मांडत आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महाएल्गार मेळाव्यामुळे वणी तालुक्यात शेतकरी आंदोलनाला नवे बळ मिळाल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले.





Comments are closed.