वेकोली अधिकारी व विरोधी पक्ष संभ्रम निर्माण करीत आहे: अहिर

0

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: वणी परिसरातील वर्धा नदीच्या खो-यातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांमध्ये खुद्द वेकोलिचे अधिकारीच त्यांना मिळणा-या मोबदल्याबाबत संभ्रम निर्माण करीत असून हा संभ्रम कायम राहावा म्हणून विरोधी पक्ष सुद्धा खतपाणी घालत असल्याचा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केला. ते सोमवार दिनांक 9 एप्रिल रोजी वणीच्या विश्रामगृहात पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होते.

वणी नॉर्थ क्षेत्रातील उकणी, वणी क्षेत्रातील बेलोरा-नायगाव डीप, निलजई डीप व मुंगोली डीप या वणी परिसरातील चार कोळसा खाण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या अधिग्रहीत होत असलेल्या शेतजमिनीबाबत मोबदला प्रलंबित आहे. याबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केंद्रीय कोळसामंत्री पियुष गोयल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा सार्थ परिणाम म्हणून कोळसा मंत्रालयाने 30 मार्च 2018 रोजी प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या हिताचे रक्षण करणारी अधिसूचना काढली.

या अधिसूचनेनुसार बिगर ओलित व ओलिताचे शेतीत असणा-या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना अनुक्रमे प्रति एकर 6 लाख, 8 लाख व 10 लाख मोबदला देण्यात येणार आहे. परंतु वेकोलिचे अधिकारी याआधी प्रसुत झालेल्या 4 ऑगस्ट 2017 च्या परिपत्रकाबद्दल प्रकल्पग्रस्त शेतक-यांना अनावश्यक सूचना देऊन या शेतक-यांमध्ये भाजपा सरकारबद्दल संभ्रम व असंतोष निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. परंतु आपण प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने जागरुक असून त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

ज्या प्रकल्पग्रस्तांना सीबी ऍक्ट 1957 च्या नियम 14 (1) नुसार कार्यवाही पूर्ण झाली आहे आणि ज्यांना 9 (1) ची सूचना प्राप्त झाली आहे. अशा प्रकल्पग्रस्तांना योग्य तो मोबदला देणार असल्याचे अभिवचनही त्यांनी यावेळी दिले. या प्रत्रकार परिषदेला वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राहुल सराफ, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, रवि बेलुरकर इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्तांना मिळणार 250 कोटी रुपये मोबदला व 1450 नोक-या 
कोळसा मंत्रालयाच्या 30 मार्च 2018 च्या परिपत्रकाअन्वये या प्रकल्पग्रस्तांना भरीव मोबदला व नोक-या मिळणार असल्याची आकडेवारी हंसराज अहिर यांनी यावेळी दिली. बेलोरा-नायगाव डीप (विस्तारित) या प्रकल्पात 292 एकर शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आली असून त्याला 58 कोटी रुपये मोबदला तर या प्रकल्पग्रस्तांसाठी 310 नोक-या, मुंगोली डीप (विस्तारित) प्रकल्पामध्ये 328 हेक्टरसाठी 65 कोटी रुपये मोबदला व 390 नोक-या, निलजई डीप (विस्तारित) प्रकल्पासाठी 410 हेक्टर शेतजमीन अधिग्रहित करण्यात येत असून यासाठी शेतक-यांना 82 कोटी रुपये मोबदला व 420 नोक-या तर उकणी या खुल्या खाण प्रकल्पात 304 हेक्टरसाठी 61 कोटी रुपये मोबदला व त्या प्रकल्पग्रस्तांसाठी 320 नोक-या उपलब्ध होणार. तसंचअपंग व महिलांना सुद्धा या नोक-यांमध्ये विशेषत्वाने सामावुन घेणार असल्याचे हंसराज अहिर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

लिंकवर क्लिक करून पाहा काय म्हणाले खा. हंसराज अहिर….

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.