शहर हादरले! अल्पवयीन मुलींशी छेडछाडीच्या दोन घटना

आरोपी जेरबंद, पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल, नागरिकांत संताप

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील शांतता पुन्हा एकदा हादरवणाऱ्या दोन संतापजनक घटना उघडकीस आल्या आहेत. निष्पाप बालपणावर काळी सावली टाकणाऱ्या या प्रकारांमुळे नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळली असून, “आपल्या मुली सुरक्षित आहेत का?” असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पहिली घटना बेलदारपुरा परिसरात घडली. घराच्या माडीवर निरागसपणे खेळत असलेल्या अवघ्या साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर 56 वर्षीय राजेंद्र गुलाब चरडे याने अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुसरी घटना निर्गुडा नदी रोड परिसरात उघडकीस आली. 11 वर्षीय मुलगी घराच्या पोर्चमध्ये खेळत असताना 52 वर्षीय एकनाथ रोहणकर याने तिच्याशी छेडछाड केल्याची घटना घडली. या प्रकरणातही पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका चौधरी व त्यांच्या पथकाकडून सुरू आहे.

दरम्यान, शहरात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Comments are closed.