आजच औषधी विकत घ्या; उद्या मेडिकल स्टोअर्स राहणार बंद
ऑनलाइन औषध विक्रीविरोधात 20 मे रोजी लाक्षणिक बंद
पुरुषोत्तम नवघरे, वणी: ऑनलाइन औषध विक्रीच्या वाढत्या प्रथेविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी 20 मे रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला असून वणी शहरातील मेडिकल स्टोअर्सही उद्या बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक औषधांची खरेदी आजच करून घ्यावी, असे आवाहन वणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
ऑल इंडिया औषधी संघटनेच्या आवाहनानुसार हा बंद पाळण्यात येत असून ऑनलाइन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या आरोग्याशी धोका निर्माण होत असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे. ऑनलाइन माध्यमातून विकल्या जाणाऱ्या औषधांची गुणवत्ता, एक्सपायरी मुदत तसेच दुष्परिणामांची जबाबदारी निश्चित राहत नसल्याने अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
तसेच, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचा गैरवापर करून नशेच्या औषधांची सहज उपलब्धता वाढत असल्याने युवकांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका निर्माण होत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. ऑनलाइन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसायावर परिणाम होऊन बेरोजगारी वाढत असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सरकारने ऑनलाइन औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे. दरम्यान, उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमित लागणारी औषधे आजच खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण उरकुडे यांनी केले आहे.


Comments are closed.