बहुगुणी डेस्क, वणी : प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात, शारीरिक संबंध आणि त्यातून निर्माण झालेला 7 महिन्यांचा गर्भ… एका 17 वर्षीय निष्पाप कुमारीकेचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही घटना वणी परिसरात उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा फायदा घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रथम बोटलावार (20 वर्षे) हा वणी शहरातील रहिवासी आहे. 5 वर्षांपूर्वी आरोपीची शहरातच राहणाऱ्या 17 वर्षीय कुमारीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. आरोपीने विश्वास संपादन करून पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. यात मुलगी गर्भवती राहिली आणि तिचा गर्भ 7 महिन्यांचा झाला.
मुलीच्या शारीरिक बदलांमुळे तिच्या पालकांच्या लक्षात आले. पालकांनी मुलीला विश्वासात घेतल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. धक्कादायक माहिती समजताच पालकांनी तातडीने गर्भपातासाठी रुग्णालय गाठले. मात्र रुग्णालय प्रशासनाने मुलगी 17 वर्षांची असल्याचे लक्षात आल्याने घटनेची माहिती लगेच पोलिसांना दिली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी प्रथम बोटलावार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि POCSO कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. वणी पोलिस स्टेशनचे अधिकारी सध्या घटनेचा सखोल तपास करत आहेत.



Comments are closed.