बहुगुणी डेस्क, वणी: पत्नी व मुलांना भेटण्यासाठी सासरवाडीत गेलेल्या पतीवर पत्नी, मेव्हणा आणि मेव्हण्याच्या पत्नीने मिळून लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना झरी तालुक्यातील पाटण येथे घडली. या मारहाणीत पतीचा उजवा हात फ्रॅक्चर झाला असून डोके, पाठ व पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी सुभाष जयराम कुरेवार (वय 39) हे गोपालपूर येथील रहिवासी असून मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा विवाह सन 2012 मध्ये पाटण येथील रेणुका हिच्यासोबत झाला असून त्यांना दोन मुले आहेत. गेल्या सुमारे 6 महिन्यांपासून कौटुंबिक वादामुळे पत्नी रेणुका मोठा मुलाला घेऊन माहेरी राहत आहे.
दि. 28 जून रोजी रात्री सुमारे 8:45 वाजता सुभाष हे पत्नी व मुलांना भेटण्यासाठी पाटण येथील सासरवाडीत गेले. तिथे त्यांना त्यांचा धाकटा मुलगा देखील दिसला. यावर त्यांनी पत्नीला धाकटा मुलगा कधी आला याबाबत विचारणा केली. त्यानंतर मुलाशी बोलताना त्याने मामा व मामीने घराबाहेर काढल्याचे सांगितले.
दरम्यान, रात्री सुमारे 9:15 वाजता फिर्यादीचा मेव्हणा दीपक पालेपवार तेथे आला. त्याने इथे कशाला आले अशी विचारणा केली. पत्नीला भेटण्यासाठी आल्याचे सांगितल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर मेव्हणा दीपक पालेपवार याने शिवीगाळ सुरू केली. पत्नी रेणुका कुरेवार, मेव्हण्याची पत्नी सुरेखा पालेपवार यांनी फिर्यादीचे हात पकडले व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी दीपक पालेपवार याने लोखंडी रॉडने उजव्या हातावर वार केल्याने हात फ्रॅक्चर झाला.
मारहाणीनंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. घटनेनंतर फिर्यादीने धाकट्या मुलाला सोबत घेत पाटण पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी वैद्यकीय अहवालानुसार दीपक कोच्चना पालेपवार, रेणुका सुभाष कुरेवार आणि सुरेखा दीपक पालेपवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 351(2), 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पाटण पोलीस करीत आहेत.


Comments are closed.