वणीतील वाहतूक कोंडीवर लढा संघटना आक्रमक

बेकायदेशीर पार्किंग, अनधिकृत वाहन थांब्यांवर कारवाईची मागणी

पुरुतोत्तम नवघरे, वणी: वणी शहरातील वाढती वाहतूक कोंडी, चौकाचौकात निर्माण झालेले अनधिकृत वाहन थांबे आणि बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत लढा संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, बसस्थानक परिसर तसेच मुख्य मार्गांवर ऑटो, ट्रॅव्हल्स आणि इतर प्रवासी वाहनांनी अनधिकृत थांबे केल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांनाही वाहतुकीत अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चौकांमध्येच वाहने उभी करत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून, शहरातील सर्व अनधिकृत वाहन थांबे तात्काळ हटविण्यात यावेत, प्रमुख चौकांमध्ये नियमित वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, ऑटो व प्रवासी वाहनांसाठी अधिकृत थांबे निश्चित करून दिशादर्शक फलक उभारण्यात यावेत, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी तसेच मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही व प्रभावी वाहतूक नियंत्रण व्यवस्था उभारण्यात यावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक हिताचा विचार करून प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा लढा संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी लढा संघटनेचे प्रमुख प्रवीण खानझोडे, आकाश दुबे, जफर खान, अशोक अंकतवार, सुभाष लसंत्ते आणि तानबाजी कडू यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.