बहुगुणी डेस्क, वणी: घराच्या जागेच्या हिस्स्यावरून झालेल्या घरगुती वादाचे रूप मारहाणीपर्यंत पोहोचले. दोन भावांमध्ये झालेल्या या मारहाणीत लहाण भावाने मोठ्या भावाला लाकडी दांड्याने मारहाण केली. वणीतील गोकुळनगर भागात शनिवारी दिनांक 11 जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणी आई व मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी (35) हा मिस्त्रीकाम करत असून तो वणीतील गोकुळनगर भागात राहतो. त्याचा धाकट्या भावाशी (25) घराच्या जागेच्या वाटणीवरून काही दिवसांपासून वाद सुरू आहे. शनिवारी (दि. 11 जुलै) रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास मोठ्या भावाने त्याच्या मुलाला पाणी मागितले. त्यावेळी आईने घरात मोठ्या मुलाशी वाद घातला. याच वेळी धाकटा भाऊ घरी आला. दरम्यान कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद वाढला.
त्यानंतर घराच्या जागेतील हिस्स्याचा विषय निघाल्याने दोन्ही भावांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वाद वाढल्यानंतर धाकट्या भावाने शिवीगाळ करत हातातील लाकडी दांड्याने मोठ्या भावावर हल्ला केला. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 118(1), 352, 351(2), 351(3) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.


Comments are closed.