बहुगुणी डेस्क, वणी: एका क्षणाच्या किरकोळ वाहतूक वादाने दुसऱ्या दिवशी भररस्त्यात हिंसक वळण घेतले. कारला कट मारल्याचा राग मनात धरून चार जणांनी तरुणाची कार अडवून त्याला बाहेर ओढत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना वणी शहरात घडली. मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही स्टीलच्या कड्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तक्रारीनुसार, फरदीन आतिक अहमद (26), रा. सबा कॉलनी, वणी हा रंगनाथनगर परिसरात पानठेला चालवितो. तो रोज त्याच्या वेगनआर या कारने पानठेल्यावर ये-जा करतो. 10 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास तो कारने रंगनाथनगरकडे जात असताना इदगाह परिसरात अनिल येमुलवार (25 रा. खरबडा मोहल्ला वणी) हा अचानक कारसमोर आला. यावेळी फरदीनने ब्रेक मारून वाहन वळवले. दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. फरदीनने “सॉरी भाई” म्हणत वाद मिटवला.
मात्र दुसऱ्याच दिवशी, 11 जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फरदीन हा त्याचा मित्र तौकीर हाफीज शेख याच्यासह कारने टिळक चौकाकडे जात होता. दरम्यान पेट्रोल पंपासमोर आरोपी अनिल हा त्याच्या 3 साथीदारासह उभा होता. त्याने दोन दुचाकी आडव्या लावून कार अडवली. अनिल येमुलवार याने त्याच्या तीन साथीदारांसह फरदीनला कारमधून बाहेर ओढून शिवीगाळ करत थपडा व बुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान मित्राला मारहाण होताना पाहून तौकीर शेख हा वाद सोडविण्यासाठी पुढे आला. मात्र त्यालाही स्टीलच्या कड्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तौकीरच्या छाती, मान, दंड आणि उजव्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याचा टी-शर्टही फाटल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी अनिल विनायक येमुलवार (25 रा. खरबडा मोहल्ला वणी) , अजय विनायक येमुलवार (21 रा. खरबडा मोहल्ला वणी), संतोष दत्ता चौगुले (25) आणि महेश भगवान माशिरकर (22) दोघेही राहणार मारेगाव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 118(1), 126(2), 296, 351(2), 351(3) आणि 3(5) अन्वये वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.


Comments are closed.