बहुगुणी डेस्क, वणी: देशभक्तीची भावना जागृत करण्यासोबतच नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री स्वामी समर्थ संगीत संघ, वणी यांच्या वतीने देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी घेण्यात येणार असून, विविध वयोगटांतील स्पर्धकांना यात सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेची पहिली फेरी सकाळी 9 वाजता होणार असून, अंतिम फेरी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी वयोगट अ : 8 ते 15 वर्षे आणि वयोगट ब : 16 वर्षे ते खुला असे दोन गट ठेवण्यात आले आहेत. दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांकाला ₹3,000 व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांकाला ₹2,000 व स्मृतिचिन्ह, तर तृतीय क्रमांकाला ₹1,000 व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय दोन प्रोत्साहनपर बक्षिसे प्रत्येकी ₹500 व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क वयोगट अ साठी ₹100, तर वयोगट ब साठी ₹200 ठेवण्यात आले आहे. प्रवेशाची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2026 असून, प्रवेश नोंदणी संताजी इंग्लिश मीडियम स्कूल, सर्वोदय चौक, वणी येथे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार स्पर्धकांनी देशभक्तीपर गीत सादर करणे आवश्यक असून, गीत सादरीकरणासाठी आयोजकांनी निश्चित केलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. अंतिम निर्णय हा परीक्षकांचा राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असल्याने वणीतील संगीतप्रेमी आणि कलाकारांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ संगीत संघ, वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शैलेश आडपावार 97647 16124 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.


Comments are closed.