बहुगुणी डेस्क, वणी: मित्राजवळ एकाच्या साळीचा मोबाईल नंबर मागणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. नंबर मागितल्याचा जाब विचारत सुरू झालेला वाद काही वेळातच हाणामारीत बदलला. संतापलेल्या व्यक्तीने लाकडी टेंप्याने तरुणाच्या डोक्यावर वार करत रक्तबंबाळ केले. ही घटना गणेशपूर येथे शनिवारी (दि. 8 ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, रितिक (24) हा गणेशपूर येथील रहिवासी असून मजुरीचे काम करतो. रंगारीपुरा येथे त्याचा ईश्वर नामक मित्र राहतो. त्याच्या घराशेजारीच पंकज (28) राहत असल्याने रितिकची त्याच्याशी ओळख होती. पंकजची सासुरवाडीही गणेशपूर येथील आहे. शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास रितिक हा गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ उभा होता. त्याचवेळी पंकज हा पत्नीसह तेथे आला. “तू माझ्या साळीचा मोबाईल नंबर ईश्वरकडे का मागितला?” असा जाब त्याने रितिकला विचारला. रितिकने आपण नंबर मागितला नसल्याचे सांगितले. यावरून वाद सुरू झाला.
खरे काय आणि खोटे काय हे स्पष्ट करण्यासाठी पंकजने ईश्वरला घटनास्थळी बोलावले. ईश्वरने रितिकने मोबाईल नंबर मागितल्याची पुष्टी केल्याने पंकज संतापला. त्याने रितिकच्या गालावर झापड मारली. त्यानंतर वाद आणखी चिघळला. रागाच्या भरात पंकजने जवळच्या घरातून लाकडी टेंपा आणला आणि रितिकच्या डोक्यावर दोन-तीन वेळा वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या मारहाणीत रितिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोक्यातून रक्तस्राव झाल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळला. त्यानंतर पंकज हा पत्नीसह तेथून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, रितिकच्या लहान भावाला घटनेची माहिती मिळाली. त्याने घटनास्थळी धाव घेत रितिकला उचलून सरकारी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर रितिकने वणी पोलीस ठाणे गाठून पंकजविरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी BNS कलम 118(2) अन्वये गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहेत.


Comments are closed.