बहुगुणी डेस्क, वणी: लोनसाठी गॅरंटर होणे चांगलेच महागात पडले… वडील गॅरंटर असलेल्या कर्जाची परतफेड झाल्याची पावती मागताच शेजाऱ्यांसोबत वाद पेटला. क्षणातच शिवीगाळ, तिखटाचा मारा अन् मारहाण सुरू झाली. डोळ्यात तिखट फेकल्यानंतर घरात ओढत नेऊन काठीने डोक्यावर मारहाण करण्यात आली. एवढ्यावरही प्रकार थांबला नाही; हाताच्या दंडाला चावा घेतल्याचीही तक्रार आहे. मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथे घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. चिंचमंडळातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी गजानन हनुमान राऊत (40), रा. चिंचमंडळ, ता. मारेगाव हे रोजमजुरीचे काम करतात. त्यांच्या घराशेजारी हनुमान चाफले हे कुटुंबासह राहतात. चाफले यांनी एका खासगी कंपनीकडून होम लोन घेतले आहे. या कर्जासाठी गजानन राऊत यांच्या वडिलांनी गॅरेंटर म्हणून सही केली होती.
18 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजता गजानन राऊत हे त्यांच्या घरासमोरील सार्वजनिक सिमेंट रोडवर होते. त्यावेळी त्यांनी हनुमान चाफले यांच्याकडे महिंद्रा होम लोनच्या कर्जाची परतफेड झाल्याची पावती मागितली. याचवेळी हनुमान चाफले यांचा मुलगा रामदास चाफले हा घरासमोरील रस्त्यावर आला आणि शिवीगाळ केली.
डोळ्यात फेकले तिखट, घेतला चावा
शिविगाळ झाल्यानंतर वाद वाढत गेला. रामदास याने गजानन यांच्या डोळ्यात तिखट फेकले. यानंतर हनुमान चाफले, रामदास चाफले आणि अतुल चाफले या तिघांनी मिळून गजानन राऊत यांना त्यांच्या घरात ओढत नेले. तिथे काठीने डोक्यावर मारहाण केली. यावेळी रामदास चाफले यांनी गजानन राऊत यांच्या डाव्या हाताच्या दंडाला चावा घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर गजानन राऊत यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे हनुमान रामाजी चाफले (65), रामदास हनुमान चाफले (सुमारे 30) आणि अतुल हनुमान चाफले (सुमारे 35), तिघेही रा. चिंचमंडळ, यांच्याविरोधात कलम 118(1), 296 आणि 3(5) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस ठाणे करीत आहेत.


Comments are closed.