ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यालयातून तांब्याचा वायर लंपास
रुग्णालयातील नव्या कार्यालयाला चोरट्यांचा डल्ला
बहुगुणी डेस्क, वणी : वणी ग्रामीण रुग्णालयाच्या नव्याने बांधलेल्या वैद्यकीय अधिकारी वर्ग-2 कार्यालयाला चोरट्यांनी लक्ष्य केले. दरवाज्याचे कडी-कोंडे तोडून चोरट्यांनी तब्बल 200 मीटर तांब्याचे वायर लंपास केले. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही खोल्यांमधील वायरिंग तोडून चोरी करण्यात आल्याने रुग्णालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तक्रारीनुसार, तक्रारदार गणेश मानिकराव चौरे (वय 58) हे ग्रामीण रुग्णालयात शिपाई म्हणून काम करीत असून ते ग्रामीण रुग्णालयातील क्वार्टर क्रमांक एम-5 येथे राहतात. दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांना नव्याने बांधलेल्या वैद्यकीय अधिकारी वर्ग-2 यांच्या कार्यालयाचा दरवाजा तोडलेल्या अवस्थेत दिसून आला.
चौरे यांनी कार्यालयाची पाहणी केली असता, स्विच बोर्डमधील प्लास्टिक पट्ट्या फोडण्यात आल्याचे तसेच तिन्ही खोल्यांमधील वायरिंग तोडल्याचे निदर्शनास आले. तपासणी केल्यानंतर अंदाजे 200 मीटर तांब्याचे इलेक्ट्रिक वायर चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती चौरे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एन. सुलभेवार तसेच इंचार्ज अरुणा गुरनुले यांना दिली.
या प्रकरणी गणेश चौरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध बीएनएसच्या कलम 305(a), 331(3), 331(4) आणि 324(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या तांब्याच्या वायरचा तसेच या चोरीमागील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.


Comments are closed.