विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. शनिवारी 21 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता हा सोहळा झाला. वणीकरांची मागील कित्येक वर्षांपासून चौकात कन्नमवार यांचा पुतळा असावा ही इच्छा होती. शनिवारी बेलदार समाजाच्या लोकांच्या या इच्छेला मूर्त रूप आले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून वामनराव कासावार, उद्घाटक हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र चोपणे, रंगरेज, स्वातंत्र्यसेनानी प्रल्हादपंत रेभे, माणिकराव ठाकरे, आनंदराव मुत्यलवार उपस्थित होते. आपल्या भाषणात हंसराज अहीर म्हणाले की, राजकारणात काही नेते चारित्र्यवान असतात. ज्याचा आदर्श घ्यावा असे नेते म्हणजे कन्नमवार होते. ज्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात कुणीही त्यांच्याकडे बोट उचलले नाही. साधी राहणी व उच्च विचार असे नेते म्हणजे दादासाहेब कन्नमवार होते. वणीत दादासाहेब कन्नमवार यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करण्याचे आश्वासन अहीर यांनी दिले. तशी इच्छा प्रस्ताविकातच आनंदराव मंथनवार यांनी बोलून दाखविली होती. त्यांच्या विनंतीला मान देत अहीर यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना जागा शोधून अभ्यासिकेचे काम लवकरात लवकर सुरू करावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदराव मंथनवार , संचालन अशोक आकुलवार सर यांनी तर पाहुण्यांचे आभार पुंडलिक आगुलवार यांनी मानले.