पाटण येथील आयुर्वेदिक आरोग्य उपकेंद्राचा कारभार रामभरोसे

महिन्यातून चार ते पाच दिवस उघडतो दवाखाना, ग्रामवासी त्रस्त

0

सुशील ओझा, झरी:- ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेकरिता शासनाने  चांगले व मोफत उपचार व्हावे या उद्देशाने शासकीय रुग्णालये व उपकेंद्राची निर्मिती केली आहे. परंतु बहुतांश उपकेंद्रावर डॉक्टरची नियुक्ती करूनही ते मुख्यालय न राहता शहरात राहून उपकेंद्र संभाळत असल्याचे  दिसत आहे . आयुर्वेदिक डॉकटरांची नियुक्ती ११ महिन्याच्या करारानुसार असते व अशीच नियुक्ती पाटण येथील उपकेंद्रात करण्यात आली आहे .

पाटण उपकेंद्रातील कारभार गेल्या ५ वर्षांपासून बोरी येथून चालू असल्याची ओरड ऐकायला मिळत आहे. पाटण उपकेंद्रात गेल्या ४ ते ५ वर्षांपासून आयर्वेदीक  डॉक्टरकडे पदभार असून मुख्यालय सुद्धा पाटणच आहे. परंतु डॉक्टर हे बोरी येथील आरोग्य अधिकाऱ्यांच्या क्वार्टरमध्ये राहून उपकेंद्र पाटणचा कारभार संभाळत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. ज्यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होतात. अशा रुग्णांना झरी, पांढरकवडा, वणी, यवतमाळसारख्या मोठ्या ठिकाणी धावावे लागत आहे. ज्यामुळे गरीब जनतेच्या पैशांचा चुराडा होऊन त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे.

उपकेंद्र महिन्यातून ४ ते ५ दिवस आपल्या मतानुसार उघडले जात असल्याचे पाटण ग्रामवासी सांगतात. आरोग्य उपकेंद्र उघडत नाही तर उपकेंद्राचा खर्च कसा काढला जातो असाही प्रश्न ग्रामवासियांनी उपस्थित केला आहे. उपकेंद्राच्या सभोवताल झाडे झुडपे वाढली असून जंगली श्वापदांची भीती निर्माण झाली आहे. सदर उपकेंद्र पांढरकवडा हद्दीत येत असून याकडे वरिष्ठ अधीकारीसुद्धा ढुंकून पाहत नाहीत. ज्यामुळे येथील  रुग्णांचे मोठे हाल होत आहे.

या पूर्वी डॉक्टर तायडे यांच्याकडे पाटण उपकेंद्राचा पदभार होता परंतु गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना बोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार मिळाल्याची माहिती आहे.  त्यामुळे पाटण येथील आरोग्य उपकेंद्राकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांत किती रुग्णांची तपासणी करून उपचार केले याची तपासणी वरिष्ठ पातळीवर  केल्यास संपूर्ण सत्य बाहेर निघेल. पाटण उपकेंद्र आरोग्य केंद्राकडे टी एच ओ यांचे लक्ष नसल्याने नेमणूक केलेले आयुर्वेदिक डॉक्टर उपकेंद्रात येतात किंवा नाही हे सुद्धा  वरिष्ठांना माहीत नसते. त्यामुळे पाटणचे उपकेंद्र रामभरोसे असल्याचे दिसत आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.