गायन, वादन आणि नृत्यातून गुरू पं. नरसिंगजी बोडे यांच्या जयंतीला आदरांजली

0

गिरीश कुबडे, अमरावती: हेमंत नृत्य कला मंदिराचे संस्थापक नृत्यगुरू पंडित नरसिंगजी बोडे यांच्या 90व्या जयंतीनिमित्त विविध कलाप्रकारांच्या सादरिकरणांनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त स्थानिक टाऊन हॉल येथे आयोजित शास्त्रीय, उपशास्त्रीय तथा सुगम गायन, वादन आणि नृत्याची मैफलीचे उपमहापौर संध्या टिकले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माजी शिक्षणाधिकारी डॉ. बी. जी. खोब्रागडे, प्रा. अरुणा श्रीरामपंत वाडेकर, पं. दत्तराज बोडे, पं. रमेश बोडे, संस्थेचे प्राचार्य डॉ. मोहन बोडे कलापीठावर उपस्थित होते. प्रास्ताविकातून प्राचार्य मोहन बोडे यांनी पं. नरसिंगजी बोडे यांच्या कलाप्रवासाचा परिचय करून दिला. संस्थेच्या प्रार्दशिक कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची यशोगाथादेखील त्यांनी मांडली. सुनील इंदुवामन ठाकरे यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडताना गुरू पं. नरसिंगजी बोडे आणि संस्थेची वाटचाल अशा अनेक विषयांवर चर्चा केली.

अमरावतीच्या उपमहापौर संध्या टिकले व उपस्थित मान्यवर

या विशेष संगीतसभेचा आरंभ हर्षित योगेश बोडे याच्या त्रितालातील कथ्थक नृत्याने झाला. प्रा. योगेश बोडे आणि त्यांच्या शिष्या स्मिता जोशी, सुचिता चौधरी, पूर्वी बोडे यांनी सतारवादन केले. याला महेंद्र बोडे यांनी पखवाजाची तर संकेत जोशी यांनी तबल्याची साथ केली. चंद्रकंस रागातील कथ्थक नृत्याचे सादरीकरण गुरू राजेश बोडे यांच्या विद्यार्थीनींनी केले. त्रितालातली ही रचना अनुष्का अरसड, अनुष्का मालवे, मृदंगा खडसे, मधुश्री शिरभाते, जान्हवी शहाळे, अंबिका तिरथकर, मानसी कापगते, अभिलाषा यावलकर, ओवी आमले, अन्वी मानकर, मुदिता मुंदावणे आणि मिहिका देशपांडे यांनी सादर केली. पं. मोहन बोडे यांच्या शिष्या साईली गणवीर आणि मानसी मकेश्वर यांनी ओडीसी नृत्यातील ‘‘पल्लवी’’ या विशेष प्रकाराचे सादरीकरण केले.

सतारवादन करताना गुरू योगेश बोडे व शिष्यपरिवार

गुरू दत्तराजजी बोडे यांच्या मार्गदर्शनात सुनीता लहाने ढोक यांनी मेघमल्हार रागात ‘‘नायिकाभेद’’ सादर केले. धृवाक्षी सुनके हिने ‘‘मोहे रंग दे लाल’’ यावर सुरेख नृत्य केले. तिलक कामोद रागातील छोटा ख्यालात प्रस्तुत नृत्य ‘‘नीर भरण’’ रसिका जोशी, खनक बाजोरिया, चार्मी हाडके, संस्कृती गुरव व चमूने सादर केले. मालकंसा रागातील कथ्थक नृत्य प्राची ढोके, प्रियंका वनकर, सिद्धार्थ इंगळे, निशा गुडधे, मैथिली जोशी, ईश्वरी ढोक, पलक पांडे, वैदेही देशमुख, वैभवी बोडे यांनी सादर केले.

हेमंत नृत्य कला मंदिराचे विद्यार्थी कथ्थकनृत्य सादर करताना

संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन व आभारप्रदर्शन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. या आयोजनात सोहन बोडे, हेमंत बोडे, जगदीश बोडे, राजेश बोडे, महेंद्र बोडे व बोडे परिवारातील सदस्यांनी गायनाची व वाद्यांची साथसंगत केली. रसिकांची भरगच्च उपस्थिती हे या कार्यक्रमाचे यशच म्हणावे लागेल.×

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.