रिक्त असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात निवेदन
गिरीश कुबडे, वणीः यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव आणि झरी हे तिन्ही तालुके आदिवासीबहुल आहेत. प्रचंड लोकसंख्या असलेले यवतमाळ जिल्ह्यातील हे तालुके आहेत. अनेक नागरिकांना त्यांच्या आरोग्यसुविधांसाठी शासकीय वैद्यकीय सेवा ही अत्यंत महत्वाची आहे. परिसरातील गरीब जनता खासगी व महागड्या वैद्यकीय सेवा घेण्यास असमर्थ आहे. मात्र या परिसरातील रिक्त असलेल्या अनेक जागांमुळे नागरिकांची अकारण ससेहोलपट होत असते. या तिन्ही तालुक्यातील लोकसंख्या बघता येथे शासकीय आरोग्य केंद्र हे लोकसंख्येच्या तुलनेत फारच कमी आहेत. नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी आरोग्य आणि आदिवासींच्या क्षेत्रात कार्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, अनेकांना कितीतरी किलोमिटर पायी किंवा अन्य साधनांचा आरोग्यसेवेसाठी वापर करावा लागतो. त्यातही जे काही दवाखाने आहेत, तिथे कर्मचारी अपुरे आहेत. दरवर्षी बदल्यांच्या काळात या परिसरात सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा तुटवडा असतो. आधीच आरोग्यकेंद्र कमी आणि त्यात कर्मचारीदेखील कमी त्यामुळे रुग्णांची अकारण हेळसांड होत राहते.
या तिन्ही तालुक्यातील नागरिकांची संख्या बघता दवाखानेदेखील अपुरे पडतात. सध्या बदल्यांचे वातावरण आहे. या तीन तालुक्यातून बदल्या होतात. मात्र रिक्त झालेल्या जागांवर बाहेरील अधिकारी वा कर्मचारी लवकर जॉईन होत नाहीत. इकडून बदली झालेले अधिकारी व कर्मचारी निघून गेल्यावर नवीन अधिकारी किंवा कर्मचारी येईपर्यंत ती जागा रिकामीच असते. या दरम्यान आरोग्यविषय कोणतीही गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. अपघात, प्रसुती अशा कोणत्याही कारणांसाठी पुरेशा अधिकारी किंवा कर्मचाÚयांच्या अभावी रुग्णांचा जीवदेखील धोक्यात येण्याची शक्यता असते.
हा परिसर आदिवासीबहुल आहे. या परिसरातील आदिवासी जनता आरोग्यदृष्ट्या तेवढी सजग नाही. अलीकडे त्यांच्यात ही जागृती हळूहळू होत आहे. ते पारंपरिक आरोग्य सुविधांसह आधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहेत. जर त्यांना असं लक्षात आलं, की आधुनिक किंवा नागरी आरोग्य सुविधांमध्येदेखील असे अनेक दोष आहेत, तर त्यांचा या सेवेवरून विश्वास उडेल. कर्मकांड व अंधश्रद्धेत अडकलेला हा समाज हळूहळू बाहेर येत आहे. जर शासनस्तरावर त्यांना अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळाली नाही तर त्यांचा अपेक्षाभंग व विश्वासभंग केल्यासारखे होईल.
आरोग्य व शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यातही या परिसरात आरोग्य हा ऐरणीवरचाच विषय आहे. जर या बदल्यांच्या काळात जागा रिकाम्या राहिल्यात तर अपघात, प्रसुती किंवा तत्सम कारणांमुळे रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. जर हा अनुशेष भरला नाही तर ही समस्या कधीही पुढ्यात येऊ शकते. नुकसान झाल्यावर हातपाय मारण्यापेक्षा आधीच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. यावर जर कोणतीच उपाययोजना झाली नाही आणि दुर्दैवाने कोणती जिवीतहानी झाली तर याला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. आग लागल्यावर विहीर खोदण्याऐवजी, ती लागूच नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी. जर आपण या अत्यंत गंभीर विषयावर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे उपरोक्त बाबींवर गांभीर्याने विचार व प्रत्यक्ष कृती करावी ही विनंती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ मार्गदर्शक जयसिंग गोहोकार, शहराध्यक्ष राजाभाऊ बिलोरिया, वणी तालुकाध्यक्ष सूर्यकांत खाडे, मत्ते, मारेगाव तालुकाध्यक्ष गणेश कळसकर,झरी तालुकाध्यक्ष जम्बे, महिलाध्यक्ष संगीता खटोड, महिला आघाडी वरिष्ठ मार्गदर्शक विजया आगबत्तलवार, राष्ट्रवादी युवा संघटना अध्यक्ष स्वप्निल धुर्वे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष शम्स सिद्धिकी, संतोष गोमकर, रामकृष्ण वैद्य, सोनू निमसटकर, रमेश मोहिते, पिसगावचे नागरिक तथा रा. काँ.चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.