आवाज वाढव डी.जे….. तुझ्यावर नियंत्रण नाही कोणाचं!

डी.जे.च्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदूषण कायद्याचा फज्जा

0

जितेंद्र कोठारी, वणीः गेल्या महिनाभरापासून लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या महिनाअखेर सर्वत्र लग्नाच्या तारखा हाउसफूल्ल असल्याने लग्नांची एकच धामधूम पाहायला मिळत आहे. सध्या विवाह समारंभात डिजे साउंड सिस्टिमचा दणदणाट गाजत आहे. डिजेचा कर्कश आवाज आणि भर दुपारी रस्त्यावर बेधुंद नाचणारी युवा मंडळीमुळे ध्वनी प्रदूषण कायदा व ट्रॅफिकचा फज्जा उडत असल्याचे वणीकर नागरिक अनुभवत आहे. काही ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करून मोठ-मोठे साउंड सिस्टिम लावले जात आहेत. डी.जे.च्या अमर्यादित आवाजामुळे रस्त्यावरील चालणारे नागरिकांना तसेच रुग्णांना व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वणी शहरातील यवतमाळ रोड, वरोरा रोड व नांदेपेरा मार्गावर स्थिती मंगल कार्यालयामध्ये आयोजित लग्न समारंभात डिजेच्या कानफाडू संगीत आणि नाशिक ढोलच्या तालावर तरुणाई बेभाणपणे नाचत असल्याने अनेकदा वादावादी होत लग्नांना उशीर होत असल्याचे दिसून येते. काही वर्षापूर्वी वरातींमधील मित्रमंडळी पारंपरिक वाद्य आणि चित्रपटातील मधुर गाणी वाजवीत असलेले बॅण्डबाज्याच्या तालावर ठेका धरत लग्नमुहूर्तावर वधूमंडपी पोहचायची. मात्र मागील काही वर्षांपासून बॅण्डबाजा आणि पारंपरिक वाद्य यांना तिलांजली देऊन डी.जे.च्या भयानक आणि कर्कश आवाजावर नवरदेवाकडील बायका, मुली, मित्र मंडळीसह एकसष्ठीपुरती झालेले वृद्धसुद्धा बेभान होऊन रस्त्यावर अक्षरशः धांगडधिंगा करीत तासन्तास उशीराने लग्नमुहूर्ताच्या नंतर लग्नमंडपी प्रवेश करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

केंद्रीय ध्वनी नियंत्रण नियमानुसार निवासी भागात सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेस ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल इतकी ध्वनीची मर्यादा आहे. आवाजाच्या प्रदूषणाचा थेट आरोग्याशी संबंध आहे. तीव्र आवाजामुळे झोपेच्या सवयी बिघडतात. डोके दुखते. ताण वाढतो. त्यामुळे हृदयाचे ठोके जलद पडतात. मोठय़ा आवाजात सतत काम करणाऱ्यांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होतो. परंतु आपल्याकडे ध्वनीविषयक र्निबधांचे सर्रास उल्लंघन होत असताना मात्र संबंधित विभागासह पोलीस प्रशासन सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहे. शहरात एकाच दिवशी अनेक लग्न समारंभ असल्यास साई मंदिर चौक, टिळक चौक, लोकमान्य टिळक कालेज, खाती चौक व अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामची परिस्तिथीसुद्धा उत्पन्न होत आहे. मात्र वणी येथील वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस गस्त करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रत्यत्न करताना दिसत आहे.
डी.जे. वाजविण्यावर शासनाने प्रतिबंध लावलेले असताना शहरात अनेक ठिकाणी डिजेचा दणदणाट कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहे. याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून असमाधान व्यक्त केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.