सुनील इंदुवामन ठाकरे, मुंबईः दादरमधील डी. एल. वैद्य रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राष्ट्रीय कीर्तन प्रशिक्षणवर्गाला आरंभ झाला. ह.भ.प. सुमन चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. राधाकृष्ण चौधरी यांनी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले. या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध भागांतील प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राचार्य विजया वैशंपायन यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी ह. भ. प. योगेश्वर उपासनी महाराज, डॉ. राधाकृष्ण चौधरी, संगीता देशपांडे व मान्यवर उपस्थित होते.
मुख्य प्रशिक्षक राष्ट्रीय कीर्तनकार, शिवकथाकार, कीर्तनभूषण, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज यांच्या मार्गदर्शनात हा वर्ग होत आहे. उपासनी महाराजांनी पूर्वरंगात ‘‘जन्म सफलता यात नराची’’ हे विनायक करंदीकरांचं शंकरा रागातील पद घेतले. मानवी जन्म घेतल्यावर त्याच्या जन्माचे सार्थक कशात आहे हे उपासनी महाराजांनी विविध दृष्टांत, दाखले आणि उदाहरणे देत विषयाचं महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. पुढील सत्रात ‘‘वासुदेव बळवंत फडके’’ या विषयावर उपासनी महाराजांचे आख्यान झाले.
वासुदेव बळवंत फडके यांचा जीवनपट महाराजांनी आपल्या कीर्तनातून जिवंत केला. संवादिनीच साथ दत्तप्रसाद शहाणे तर तबल्याची साथ केदार आठवले करीत आहेत. जळगाव येथील ह.भ.प. मनोहर खोंडे यांनी उद्घाटन सोहळ्याचे संचालन केले. या शिबिराच्या आयोजनासाठी ह.भ.प. डॉ. संगीता देशपांडे, ह.भ.प. प्राचार्या विजया वैशंपायन, ह.भ.प. सविता कुळकर्णी, अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाध्ये हे परिश्रम घेत आहेत.