कोळशाच्या जड वाहतुकीमूळे रुईकोट-अर्धवन मार्ग ठप्प
रोडवरील २ ते ३ फुटांच्या खड्यांमुळे अपघाताची शक्यता
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पांढरकवडा (लहान) येथील टॉपवर्थ कोळसा खाण आहे. या खाणीतून दिवसरात्र ओव्हरलोड कोळशाचे ट्रक भरून वाहतूक केली जात आहे. या मार्गावरून जाणारे ट्रक फेल झाल्याने रुईकोट अर्धवन मार्गात वाहतुकीची कोडी निर्माण झाली.
शुक्रवारी ६ जुलै रोजी रात्री कोळशाचे ४ ट्रक रुईकोट ते अर्धवन मार्गावर बंद पडले. ज्यामुळे शनिवारी पहाटे अर्धवन, मार्की व लहान पांढरकवडा येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थाना व गाडी चालकांना तसेच शेतकऱ्यांना मुकुटबनला येण्यासाठी चांंगलीच कसरत करावी लागली. त्यांना मागे फिरून १५ किमी जास्त फेरी घेऊन जावे लागले. सदर नादुरुस्त ट्रकबाबत माहिती कोळसा कंपनीच्या कर्मचाऱ्याला सामाजिक व जागृत कार्यकर्ता आझाद उदकवार यांनी माहिती दिली व रोडवरील नादुरुस्त ट्रक हटवण्यास सांगितले.
याबाबत माहिती पोलिसांनाही देण्यात आली. त्यामुळे ठाणेदार धनंजय जगदाळे हे ताफा घेऊन घटनास्थळी पोहचले व कंपनीच्या कर्मचार्यांना कडक सूचना देऊन ट्रक हटविण्यास सांगितले. ट्रक काढण्याकरिता क्रेन आली आहे. वृत्त लिहेपर्यंत नादुरुस्त ट्रॅक निघाले नव्हते.
गेल्या सहा महिन्यांपासून टॉपवर्थ कोळसा खाण सुरू झाली असून या खाणीतून नागपूर येथील बालाजी ट्रान्सपोर्टचे सुमारे १५ ते २० ट्रॅक कोळसा वाहतूक करतात. प्रत्येक ट्रकमध्ये २७ ते ३० टन कोळसा भरून वणी येथे वाहतूक केली जाते. त्यामुळे रुईकोट ते अर्धवन मार्गाचे तीनतेरा वाजले असून रोडवर अनेक ठिकाणी २ ते ३ फुटाचे खड्डे पडले आहे.
रुईकोट ते अर्धवन रोड सिंगल असून याचा वापर लहान गाड्याकरीता होता. परंतु कोळसा खाणीतून जड वाहतूक सुरू झाल्याने सदर रोडने दुचाकी जाणे कठीण झाले आहे. तर मार्की, अर्धवन, व लहान पांढरकवडा येथे शाळकरी विद्यार्थी ऑटो ने जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. ऑटो पलटी होण्याची भीती मनात बाळगून विद्यार्थी सध्या प्रवास करीत आहे.
कोळशा खाणीतील जड वाहतुकीवर आरटीओ विभागाचे लक्ष नाही. या विभागाने जणू ट्रान्सपोर्टवाल्यांना जड वाहतुकीचा जसा परवानाच दिला अशी इथली परिस्थिती आहे. कोळशा खाणीतून होणारी जड वाहतूक बंद करावी अशी मागणी या परिसरातील लोक करीत असून मागणीकडे दुर्लक्ष केल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.