वणीत 1265 लाभार्थ्यांना मिळणार घरकुल

0

विवेक तोटेवार, वणी: येथील नगर परिषदेने पंतप्रधान आवास योजनेचा सतत भक्कम पाठपुरावा केल्यामुळे पहिल्या टप्प्यात 1265 कुटुंबाला स्वतःचे हक्काचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे  यांनी दिली आहे.

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत वणी शहराला 2683 घरकुलाचे उद्दिष्ट होते. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे दोनदा सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार करून प्रथम नगर परिषद प्रशासन संचालनालयाला पाठविण्यात आला. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव म्हाडाकडे पाठविण्यात आला. म्हाडाने हा परिपूर्ण प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविल्यानंतर केंद्राने पहिल्या टप्प्यात 1265 घरकुलांना मंजुरात दिली आहे.

स्वतःच्या किंवा 15 ते 20 वर्षांपासून नझुलच्या जागेवर राहत असणाऱ्याना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांला राज्य शासनाकडून दीड लाख व केंद्र शासनाकडून एक लाख असे अडीच लाख रुपये नगर परिषदेमार्फत मिळणार आहेत. उर्वरित अडीच लाख रुपये लाभार्थ्यांनी खर्च करून आपापल्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. येत्या दोन महिन्यानंतर लाभार्थ्यांना घरकुलाची रक्कम मिळायला सुरुवात होणार आहे. अशी माहिती मुख्याधिकारी संदीपकुमार बोरकर यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.