कामाला लागा, आता डायरेक्ट वणीतच भेटू- अजितदादा पवार

पक्षाने व नेत्यांनी दिले डॉ. लोढा यांना बळ

0

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूरः तिकिटाची चिंता करू नका. तुम्ही तुमचे कार्य असेच निरंतर वेगाने सुरू ठेवा. पक्ष आणि आम्ही सगळे डॉ. महेंद्र लोढा यांच्या सोबतच आहोत. आता जनतेशी, कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद वाढवा. कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा. आता आपली भेट थेट वणीलाच होणार आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी केले. नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, खा. कुकडे, आ. मधुसूदन केंद्रे, राजेश टोपे, प्रकाशभाऊ गजभिये  व पक्षाचे आमदार प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, या मेळाव्याचे आयोजन करून डॉ. लोढा यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. डॉ. लोढा यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेत पवारांसह सर्वच नेत्यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले. डॉ. लोढा यांना प्रत्यक्ष कामाला लागण्याची त्यांनी सूचना केली. पवार म्हणाले की, आपल्याला उत्तम तयारी करायची आहे. सगळे मिळून पक्ष हा बळकट होत आहे. 1999ला पक्ष स्थापनेनंतर हवा तसा वाढला नाही. मात्र उथळपणे व घाईगडबडीने काम न करता, पक्ष काम करीतच राहिला. 2004 च्या निवडणुकीत पक्षाला बरेच यश मिळाले. पण तोपर्यंतच्या काळात टीकाटिपण्या झाल्यात. आपण आपल्या कार्याशी प्रामाणिक असावं. सतत कार्यरत असावं. लोकहितासाठी लढत राहावं. जनता न्याय करतेच. असेही अजितदादा म्हणाले. डॉ. लोढा यांच्या कार्याची त्यांनी वारंवार नोंद घेतली.

वणी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाव खेड्यातील कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांना भेटता यावं, त्यांच्याशी संवाद साधता यावा म्हणून नागपूर येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी मेळावा आयोजित केला. वणीसह परिसरातील खेड्यापाड्यांतील अनेक कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. आपल्या पक्षातील अनेक बड्या नेत्यांना सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना भेटता आलं. कार्यकर्त्यांसाठी ही एक अपूर्व मेजवानीच ठरली. या मेळाव्यात खेड्यापाड्यांतील सामान्य कार्यकते, पदाधिकारी, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, प्राध्यापक, कलावंत अशी अनेक मंडळी आवर्जून उपस्थित होती.  कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना अजितदादांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्यात.

डॉ. महेंद्र लोढा यांनी यावेळी आपली प्रास्ताविक भूमिका मांडली. ते म्हणाले की, सामान्य कार्यकर्ते हे आपल्या नेत्यांना केवळ टिव्ही किंवा अन्य मीडियातूनच भेटतात. या मेळाव्याच्या निमित्ताने निवांत भेटता येईल. आपल्या नेत्यांना ऐकता येईल. त्यांच्याशी संवाद साधता येईल. अनेक महत्त्वाच्या विषयांवर थेट चर्चा करता येईल. हा या मेळावा घेण्यामागचा उद्देश असल्याचं डॉ. लोढा म्हणाले. पक्षाला बळकटी व नियोजनात्मक दिशा देण्यासाठी या मेळावा एक महत्त्वाचं पाऊल ठरल्याचंही डॉ. लोढा म्हणाले.

यवतमाळ जिल्हा, वणी शहर हे सातत्याने दुर्लक्षित राहिलं. वीज, रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत डॉ. लोढा यांचं कार्य अजूनही निरंतर सुरूच आहे. त्यांनी अनेक अंगणवाड्या दत्तक घेतल्या. अनेक रस्ते लोकसहभागातून तयार केले. समाजकार्यात अग्रेसर असणारे डॉ. लोढा यांना राजकारणाची साथ मिळाली. त्यांना राजकारणासह समाजकारण यांचा जोडीने समाजाला प्रगतीच्या दिशा मोकळ्या करण्यासाठी डॉ. लोढा यांची वाटचाल सुरू असल्याचं ते बोलले. यासाठी उपस्थित वरिष्ठ नेते व सर्व कार्यकत्यांना त्यांनी सहकार्याची विनंती केली.

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना ज्येष्ठ नेते

डॉ. लोढा यांनी लोकांच्या वाढत्या सहकार्याचं आणि सहभागाचं बोलकं स्वरूप मांडलं. ते म्हणाले की, वणी विभागात राष्ट्रवादीचे कार्य अत्यंत जोमात सुरू आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्याचा आवाका वाढत चालला आहे. सर्वत्र अत्यावश्यक असे वीज, रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत अनेक कामे वणी विभागात राष्ट्रवादीच्या पुढाकारातून झाली आहेत. लोकांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. अनेक लोक आपल्या समस्या व मागण्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात घेऊन येतात. त्या समस्यांवर काम होतं म्हणून लोक निरंतर येत असतात. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होते हे बघून समाधान होत असल्याचं डॉ. लोढा म्हणाले.

या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला. धनंजय मुंडे आणि डॉ. लोढा हे वर्गमित्र असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या या मेळाव्यात सगळ्याच नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्यात. याबद्दल त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले. कार्यकर्ते व नेत्यांच्या भेटीत थेट संवाद होतो. याला अत्यंत महत्त्व असल्याचंही ते म्हणाले. यापुढे वणीलाच असा मेळावा घेण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. डॉ. लोढा यांच्या सामाजिक कार्याची दखल सगळेच घेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी डॉ. लोढा यांच्या कार्याचा गौरव केला. पक्षाच्या यशस्वी कारकीर्दीचा त्यांनी धावता आढावा घेतला. ते म्हणाले की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात पक्ष नव्याने भरारी घेतो आहे. लाटा येतात आणि जातात. पवार साहेबांचं काम, मतं ही समाजाला, देशाला किंबहुना संपूर्ण मनुष्यजातीलाच पूरक असतात. गुणवत्तेचं काम सावकाश चालते.पवार साहेबांसारखं नेतृत्व कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रात नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळत आहे. कार्यकर्ते जवळ यावे. नव्या जुन्यांनी एकमेकांना मानसन्मान दिला पाहिजे. गावागावातून अनुभवलेल्या विषयांवर काम करा. देशात प्रचारांची कृत्रीम लाट निर्माण करण्यात आली. आता लोकांना खरं काय ते देऊ या. मोठ्या शक्तीने उभं राहू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉ. लोढा यांच्या सोबत आहेच. वणी विभातील जनतादेखील त्यांच्या समाजकार्याचा झपाटा पाहून त्यांची साथ देत आहेत.

यावेळी वणीकर जनतेच्या वतीने राजाभाऊ बिलोरिया, डॉ. हेमलता लामगे,  डॉ. विकास हेडाऊ, सपाट, आशा टोंगे, जांगडा, विजया आगबत्तलवार, मत्ते व पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निमसटकर यांनी केले. सोहळ्याचे आयोजक डॉ. लोढा यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सोहळ्याला वणी, मारेगाव, झरी पासून यवतमाळ जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.