सुशील ओझा, झरी: शिक्षणाचा गाजावाजा करणाऱ्या शिक्षण विभाग अंतर्गत झरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल ६२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. २०१८-१९ चे शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे. परंतु शाळांना अजूनही शिक्षक मिळाले नसल्याने दररोज तालुक्यातील पालक आणि शाळा व्यवस्थापन समित्या शिक्षण विभागात धडकत आहे..
‘प्राथमिक शिक्षण हे विकासाचे लक्षण’ या ब्रीदाचा अवलंब करणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची संख्या तालुक्यात ११६ आहेत. यात पहिली ते पाचवीपयंर्त ७६ तर पहिली ते आठवी पयंर्त ४० शाळा विद्यार्थ्यांना तोकड्या शिक्षकांच्या संख्येत अध्यापनाचे धडे देत आहेत.
तालुक्यातील ११६ जिल्हा परिषद शाळांना जिल्हा शिक्षण विभागाकडून ३७२ शिक्षकांची मंजुरी देण्यात आली असताना तालुक्यातील शाळांना केवळ ३१० शिक्षक पुरविण्यात आले आहेत. अजूनही शाळांना ६२ शिक्षकांची गरज आहेत. अशा रिक्त शिक्षकांच्या पदामुळे तालुक्यातील बहुतांश शाळांतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहेत. .
यात मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांचे अध्यापनात शैक्षणिक नुकसान होत असल्याने दररोज शिक्षकांच्या मागणीसाठी पालक, व्यवस्थापन समित्या पंचायत समितीवर धडकत आहेत..
शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा खेडळखंडोबा होत आहे. आजही तालुक्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांत मोठी भर पडली आहे. यात खडकी, गाडेघाट, रेंगापोड, चिचपोड, बिहाडी पोड, गारगोटी पोड, चिखलडोह, परसोडी, मुधाटी, लांडगी पोड, बेलमपल्ली, यदलापूर, गाडेघाट (धानोरा), हिरापूर (जुना), पवनार, शेकापूर, आंबेझरी (बु.), बोरगाव (बंदी.), रायपूर, दिग्रस (जुना), दरारा आणि रायपूर या २२ शाळांचा समावेश आहे.
अशा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना दोन शिक्षक असल्याची मोठी अडचण शिक्षण विभागापुढे असल्याने जिल्हा शिक्षण विभागाने मंजूर शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी झरी जामणी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. शासन विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण मिळावे, याकरिता विविध योजना राबवित आहे.
तर मागील सत्रात शिक्षकांची ऑनलाइन बदली झाल्याने तालुक्यातील शाळांतील शिक्षकांची पदे रिक्त पडून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे शिक्षकच नसल्याने तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे..