तालुका प्रतिनिधी, मारेगाव : तालुक्यातील आदिवासीबहुल गाव असलेले शिवनाळा येथील जिल्हा परिषद शाळा पटसंख्येअभावी बंद करुन उमरीपोड येथे समायोजित केल्याने विद्यार्थ्यांना जाण्यायेण्याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे शिवनाळा येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी ही बाब गटशिक्षणाधिकारी पं.स.मारेगाव यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर दुर्लक्ष होत असल्याने रोष व्यक्त करीत शिवनाळा ग्रामस्थ शाळा पूर्वरत चालू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह नागरिक रस्त्यावर उतरले. नाळा वासियानि वणी यवतमाळ महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले.आंदोलन बऱ्याच वेळ सुरु असल्याने वाहनाच्या महामार्गावर रांगा लागल्या होत्या.
शिवनाळा येथे अनेक वर्षांपासून वर्ग पहिली ते पाचवी जि.प. शाळा सुरु असताना पटसंख्या कमी झाल्याचे कारण पुढे करून शिक्षण विभागाने शाळा बंद करून शिवनाळा गावानजिक उमरीपोड येथे शाळा समायोजित केली. परंतु उमरी पोड़ येथे जाण्यायेण्याच्या मार्गावर नाला पड़तो. पावासामध्ये नाला भरला की विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे येणे बंद होते. तसेच पावसाळ्यात चिखलाच्या मार्गाने जाणे येणे करावे लागते. तसेच रस्ता लहान असल्याने सरपटणाऱ्र्या प्राण्यांपासून जीवितास धोका आहे. आदी कारणास्तव पालकवर्ग चिंताग्रस्त झाला.
विद्यार्थी शाळेत जात नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याने पूर्वरत शाळा चालू करण्याच्या मागणीसाठी शिवनाळा ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून वणी यवतमाळ महामार्गावर जवळपास एक तास चक्का जाम आंदोलन केले. आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मारेगावचे तहसीलदार विजय साळवे पं..स.गटशिक्षणाधिकारी आंबटकर यांनी आन्दोलकांची भेट घेऊन चर्चा केली. आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळेस गावकरी शालेय विद्यार्थी व जि.प .सदस्य अनिल देरकर उपस्थित होते.