सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूरः पंढरपूरला वारीला जाणं सगळ्याांनाच शक्य नसतं. विदर्भापासून पंढरपूर बरंच लांब आहे. त्यामुळे साक्षात परब्रह्म विठ्ठलांनी कळमेश्वरजवळील धापेवाडाजवळ भक्तांसाठी व्यवस्था केली असल्याची आख्यायिका आहे. इथे आषाढी पौर्णिमेच्या काळात ठिकठिकाणाहून भाविक वारीसाठी येत असतात.
आषाढी पौर्णिमेला नागपूर जवळील धापेवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अनेक भक्त दरवर्षी येतात. काही वारकरी हे पायी यात्रा काढतात. टाळ, मृदंगाच्या गजरात अनेक पालख्या ठिकठिकाणांहून येतात. या यात्रेनिमित्त परिसरातील अनेक गावांमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. केवळ विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रासह अनेक भागांतून भाविक इथे दर्शनाला येतात.
अशी आहे आख्यायिका
धापेवाड्यााचे पुरातन नाव हे धर्मनगरी होते. उमरेड तालुक्यातील बेला येथील सद्गुरू कोलबास्वामी महाराज हे येथे आले. गावातील मालगुजार उमाजी आप्पा खोलकुटे यांनी त्यांना आश्रय दिला. कोलबास्वामी हे पांडुरंगाचं निस्सीम भक्त होते. ते नियमित वारकरी होते. न चुकता ते पंढरपूरला वारीला जायचे. पुढे चालून ते वृद्ध झालेत. त्यांना वारीला जाणे अशक्य वाटायला लागलं. आता वारी हुकणार या चिंतेने त्यांना ग्रासलं. ते अत्यंत अस्वस्थ झालेत. कासावीस झालेत.
एका रात्री कोलबास्वामींना विठ्ठलांनी स्वप्नात दर्शन दिले. गावाजवळून चंद्रभागा नदी वाहते. त्या नदीच्या काठावरील एका विहिरीत शोध घेण्याचं विठ्ठलांनी स्वप्नात सांगितलं. ज्यांना एकादशीला पंढरपुरात येणे शक्य होणार नाही त्यांना आषाढी पौर्णिमेला धापेवाडा येथेच दर्शन देईल असा विठ्ठलांनी दृष्टांत दिला. आषाढी पौर्णिमेला पंढरपूरचे कपाट बंद असते.
स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे कोलबास्वामीनी आणि उमाजी आप्पा यांनी ती विहीर शोधली. त्या विहिरीत त्यांनी विठ्ठल व रुक्मिणीच्या सुबक मूर्ती आढळल्यात. या मूर्तींची इ.स. 1741 साली प्राणप्रतिष्ठा झाली. मोठा उत्सव साजरा करण्यात आला. तेव्हापासूनच या स्थानाचे महत्त्व वाढले. भाविक आषाढी एकादशी ते आषाढी पौर्णिमेपर्यंत दर्शनासाठी येतात.
येथून वाहणारी नदीदेखील चंद्रभागाच आहे. ही नदी तशी पूर्ववाहिनी आहे. मात्र या परिसरात येताच ती उत्तरवाहिनी होते. पुढे ती सावनेर तालुक्यातील पाटण सावंगीजवळ कोलार नदीला मिळते. या नदीत अनेक भाविक स्नान करतात. मात्र यावेळेला नदीच्या पात्रात पुरेसे पाणी नव्हते. भक्तांची वाढती संख्या बघता विशेष सुविधा देण्यात आल्या होत्या. अलीकडच्या काळात इथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढच होत आहे. या ठिकाणी मोठी यात्रा भरते. एस.टी. महामंडळाने इथे जाण्यासाठी विशेष जादा गाड्यादेखील सोडल्या आहेत.