परमडोहच्या सरपंच पदावरून पायउतार

एकाच वेळी दोन पदाचा आर्थिक लाभ घेणे भोवले

0
विलास ताजने, मेंढोली: शिंदोला लगतच्या परमडोह येथील सरपंचाना एकाच वेळी दोन पदाचा आर्थिक लाभ घेणे भोवले आणि सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले.
वणी तालुक्यातील परमडोह येथील ग्रामपंचायत निवडणूक २५ जुलै २०१५ ला पार पडली. अविरोध पार पडलेल्या या निवडणूकीचा निकाल २७ जुलैला घोषित करण्यात आला. सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड ७ सप्टेंबर २०१५ ला पार पडली. सदरच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी प्रगती श्रीकृष्ण बावणे  तर उपसरपंच पदासाठी संदीप गोविंदा थेरे यांची एकमताने निवड झाली. मात्र सरपंच म्हणून निवडून आलेल्या प्रगती बावणे यांनी आशा स्वयंसेवीका म्हणून आरोग्य विभागात लाभाचे पद धारण केलेले होते. सदरचे पद हे ग्रामपंचायत सदस्य तथा सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा धारण केले होते.
म्हणून गैरअर्जदार सरपंच प्रगती बावणे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (फ) नुसार अपात्रता धारण केलेली असल्याने ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करून अपात्र घोषित करण्याची मागणी अर्जदार उपसरपंच संदीप थेरे यांनी करीत न्यायालयात याचिका दाखल केली. सदर प्रकरणात न्यायालयात अर्जदाराची बाजू ऍड.विवेक गंधरवार यांनी मांडली. बावणे यांना नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्या. तसेच त्यांनी लेखी पत्र किंवा युक्तिवाद न्यायालयात दाखल केला नाही. सदर प्रकरणात अर्जदार यांचा लेखी युक्तिवाद आणि इतर दाखल दस्ताऐवजाचे अवलोकन करून स्पष्ट केले की, गैरअर्जदार यांना काहीच सांगावयाचे नाही.
तालुका आरोग्य अधिकारी वणी यांचे पत्राप्रमाणे प्रगती बावणे यांनी सप्टेंबर २०१५ पासून मार्च २०१६ पर्यंत आशा पदाचे व सरपंच पदाचे मानधन दोन्ही घेतलेले होते. यात गैरअर्जदार सरपंच बावणे या दोषी असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. त्यामुळे महाराष्ट्र अधिनियम १९५९ चे कलम १४ (फ) नुसार यवतमाळचे अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी प्रगती बावणे यांना ग्रामपंचायत पदाकरिता ३१ जुलै २०१८ ला अपात्र घोषित केले. सदर निकालाच्या प्रती वणीचे तहसीलदार, वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि परमडोहचे सचिव यांना प्राप्त झालेल्या आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.