विलास ताजने, मेंढोली: पैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेल्या साखरा(कोलगाव) गावात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्याकडे ग्रामपंचायत पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. म्हणून दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या समस्या सोडविण्याची मागणी पंचायत समिती गटविकास अधिकारी वणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वणी तालुक्यातील साखरा (कोलगाव) हे एक हजारच्या जवळपास लोकसंख्या असलेल गाव. गावालगतचा परिसर कोळसा खाणीने व्यापलेला त्यामुळे लोकांना रोजगाराची संधी मिळाली. गावात आर्थिक सुबत्ता आली. परंतु दिवसेंदिवस गावात निर्माण होणाऱ्या सार्वजनिक समस्या दुर्लक्षित राहिल्या. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी कूपनलिका खणून पाण्याचा प्रश्न सोडविला. मात्र सध्या सदर ठिकाणी घाण पसरली आहे. गाळ साचलेला आहे परिणामी दूषित पाणी पुरवठा होत असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गावातील सांडपाणी साचलेले आहे. गावातील मलनिस्सारण करण्यासाठी नाल्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु काही ठिकाणी उघड्या असलेल्या चेंबरमूळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाल्याची नियमितपणे साफसफाई करण्यात येत नसल्यामूळे पावसाळ्यात दुर्गंधी पसरली असते. विशेष म्हणजे साखरा गाव वेकोलीने दत्तक घेतलेल्या गावापैकी एक आहे.
दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले जात नाही. म्हणून सदर समस्या सोडविण्याची मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी यांच्याकडे केली आहे. निवेदनावर शांताराम उपासे, प्रमोद मेळावार, सुधाकर पानघाटे, अरविंद उपासे, राहुल चौधरी, महेश कुचनकर, मधुकर मिटकर, सचिन पिंपळकर यांच्या सह्या आहेत.