तेलंगणात अवैधरित्या पायदळ जाणारे ३० बैल पोलिसांच्या ताब्यात
जामनी येथील युवकांच्या सतर्कतेमुळे तस्करीचा पर्दाफाश
सुशील ओझा, झरी: तालुक्यात पायदळ जनावरं तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगळवारी रात्री गोतस्करीची अशीच एक घटना समोर आली. मात्र काही तरुणांच्या सतर्कतेमुळे ही तस्करी उघड झाली. सध्या या प्रकरणी पोलिसांनी 30 बैलांना ताब्यात घेतले असून दोन आरोपींना अटक केली आहे.
११ सप्टेंबर मंगळवारी रात्री पायदळ ३० जनावरे तेलंगणात नेत असल्याची माहिती जामनी येथील युवकांना मिळाली. रात्री 12च्या सुमारास हे युवक घटनास्थळी पोहचले. सदर ३० बैल दुर्गापूर गावाजवळील एका शेतात आढळले. तरुणांनी सर्व बैल व बैल घेऊन जाणारे दोन मजूर यांना ताब्यात घेऊन जामनी गावात नेले. बैलांना एका शेतकऱ्याच्या गोठ्यात ठेवले व पहाटे पाटण पोलिसांना याबाबत कळविले.
यावरून पोलीस जामनी गावात जाऊन पंचनामा केला व सर्व बैल मांडवी येथील गौशाळेत पाठविले. बैल मालक महेमूद शेख मजूर इंदर देवसिंग चव्हाण व प्रमोद डोमाजी सोनवणे तिनही रा. उमरी यांच्या विरुद्ध प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन्ही मजुराला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार शिवाजी लष्करे यांच्या मार्गदर्शनाखाली पीस उपनिरीक्षक सुरेश किनाके व आडे करीत आहे.
मारेगावचा तस्लिम, उमरीचा महमूद व बोरीचा आसिफ या जनावर तस्करांनी कहर केला आहे. दिवसरात्र खुलेआम वेगवेगळ्या मार्गाने हे तस्कर बैलांची पायदळ तस्करी करतात. या तस्करीबाबत सर्वसामान्यांना आधीच माहिती मिळते पण पोलिसांना का मिळत नाही असा प्रश्न परिसरात विचारला जात आहे.