लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे “नॅक टीम” द्वारे परीक्षण
सुरेंद्र इखारे, वणी: राष्ट्रीय मुल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) ही भारतातील महाविद्यालयांचे मुल्यांकन करून व शैक्षणिक कामकाजाच्या दर्जाचे निरीक्षण करून गुणवत्तेचे प्रमाण ठरविणारी संस्था आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार महाविद्यालयाने नॅक द्वारा परीक्षण करणे गरजेचं आहे. वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात दिनांक १८ आणि १९ सप्टेंबर २०१८ रोजी नॅक कमिटीद्वारा परीक्षण करण्यात आले.
डॉक्टर राधेश्याम शर्मा (माजी कुलगुरू ,हरियाणा), डॉक्टर अशान रिद्दी (प्राध्यापक, अरुणाचल प्रदेश) आणि डॉक्टर पायल मागो (प्राचार्य, दिल्ली) या चमूने महाविद्यालयात येऊन महाविद्यालयात विविध विभागात चालणाऱ्या सातत्यपूर्ण कार्याची विविध निकषांच्या आधारे तपासणी केली.
यापूर्वी २००५ मध्ये नॅक कमिटीद्वारा महाविद्यालयाचे परीक्षण झाले होते. त्यानंतर या दुसऱ्या फेरीतील परीक्षणासाठी महाविद्यालयाने २०१५ पासून विशेष परिश्रम घेण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास करीत त्यानुसार सातत्याने चालणा-या कार्याचे चमू समोर सादरीकरण केले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला यांच्यासह सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य विजय वाघमारे, अंतर्गत गुणवत्ता शाश्वती केंद्राचे (IQAC) संचालक डॉ. प्रसाद खानझोडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य माणिक राठोड यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या समस्त प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वणी सारख्या सुदूर प्रांतात, आदिवासीबहुल विभागात उपलब्ध मर्यादित साधनसामुग्रीच्या द्वारे महाविद्यालयात चालवलेल्या विविध उपक्रमांचे चमूने विशेष कौतुक केले.
प्रत्येक विभागाचे सादरीकरण ,विद्यार्थी ,माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक गण अशा विविध समूहांशी संपर्क साधून चमूने चर्चेतून विविध कार्यांची तपासणी केली. सायंकाळी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला
Best college in the wani city