मुंबई: शेतक-यांना कर्जमाफी मिळावी यासाठी राज्यभरातील शेतक-यांनी आंदोलन केलं. यानंतर महाराष्ट्र सरकारने शेतक-यांसाठी 34 हजार कोटी रुपांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. कर्जमाफीचा शेतक-यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसतानाच आता या कर्जमाफीसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. मात्र, या घोषणेची फडणवीस सरकारने इतकी जाहिरातबाजी केली की त्यासाठी लाखो रुपये खर्च केल्याचं उघडं झालं आहे.
कर्जमाफीच्या निर्णयाच्या जाहिरातबाजीसाठी राज्य सरकारने तब्बल 36 लाख 31 हजार रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे. हा खर्च केवळ 51 वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातींचा आहे. यामध्ये टीव्ही, वृत्तवाहिन्या, मनोरंजन वाहिन्या आणि होर्डिग्जवरील जाहीरातीसाठी झालेल्या खर्चाचा समावेश नाहीये.
24 जून रोजी महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावे दिलेल्या या जाहीरातींमध्ये देशातील सर्वात मोठी कर्जमाफी, ऐतिहासिक कर्जमाफी असा दावा सरकारने केला आहे. मात्र, अद्याप शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाहीये. शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याआधीच जाहिरातींवर सरकारने लाखोंची उधळण करत पैसा खर्च केला आहे.