श्री जैताई देवस्थानच्या शारदीय नवरात्रात ऋतुपर्ण रामदासींची कीर्तनसेवा
सुरेंद्र इखारे, वणी : “सामान्य व्यवहारात सुद्धा समोरच्या वस्तूचा भाव पाहिल्याशिवाय आपण त्या वस्तूच्या जवळ जात नाही, मग आपल्या अंतरंगी भाव नसेल तर भगवान आपल्याजवळ येतीलच कसे? साधनेत भावाचा अभाव असेल तर भगवंतांचा प्रभाव प्रत्ययाला येतच नाही” असे प्रतिपादन युवा कीर्तनकार हरिभक्तिपरायण ऋतुपर्ण रामदासी यांनी केले. स्थानिक जैताई देवस्थानच्या शारदीय नवरात्रात कीर्तनसेवेचा आरंभ करताना आज प्रथम पुष्पात ते संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांच्या निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म या अभंगावर निरूपण करीत होते.
नऊ दिवसात नऊ रंग वापरण्याच्या सध्याच्या व्यापारीवर्गाच्या उद्योगाला शास्त्रात कुठलेही स्थान नाही हे विशद करीत, हौस म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर करावे. पण या गोष्टींमध्ये आपण जेवढा वेळ देतो त्यापेक्षा अधिक वेळ खऱ्या उपासनेला असायला हवा हे त्यांनी अधोरेखित केले. उत्तररंगात त्यांनी संतश्रेष्ठ नामदेव महाराज आणि जनाबाईंचे दीपावलीचे आख्यान सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन देवस्थानचे सचिव माधव सरपटवार यांनी तर बुवांचा सत्कार आणि आरती विश्वस्त किशोर साठी यांनी संपन्न केली. संवादिनीवर साथ करणाऱ्या अरुण दिवे यांनी मध्यंतरात आया हू दरबार तुम्हारे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गीत सादर केले. तबल्यावर साथ संगत अभिलाष राजूरकर यांनी केली. दोन दिवसांच्या या कीर्तन सेवेतील पहिल्या दिवशी वणीकरांचा लाभलेला प्रतिसाद या युवा कीर्तनकाराचा उत्साह वाढवणारा ठरला.