ज्योतिबा पोटे, मारेगाव: यावर्षी मारेगावात एका ठिकाणी रावण दहन करून तर दुस-या ठिकाणी रावणाची पूजा करून दसरा साजरा करण्यात आला. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून मारेगावात रावण दहन करण्यात येते. यावर्षी काही आदिवासी संघटनेने रावन दहनाला विरोध केला होता. मात्र अखेर हा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
रामाने रावणाचा वध करून पत्नी सीतेची त्याच्या तावडीतून सूटका केली होती, अशी आख्यायिका आहे. राजा रावण अनिष्ट प्रवृत्तीचे प्रतीक आहे, अशी मान्यता फार वर्षापासून आहे. परंतु यातही काळानुसार वैचारिकदृष्टी बदलत आहे. शहरी भागासह दुर्गम भागातही राजा रावणाबद्दल असलेला समज, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.
राजा रावण अनिष्ट प्रवृत्तीचा होता, असा समज समाजातील बहुसंख्य वर्गात आहे. तर रावण हा मूलवंशी राजा असून रावण आपला पूर्वज आहे. तसेच रावण हा महान आयुर्वेद शास्त्रज्ञ, प्रजापती राजा, स्त्रियांचा आदर करणारा होता, असा भाव बहुसंख्य आदिवासी बांधवांमध्ये आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांनी या वर्षी रावण दहनाला विराध केला होता. याबाबत तहसिलदारांना निवेदन देखील दिले होते.
या पाश्वभूमीवर मारेगावात रावण दहन कमेटीद्वारा राष्ट्रीय विद्यालय शेजारील मैदानात रावणाचा २५ फुट पुतळा उभारण्यात आला होता. संध्याकाळी तिथे रावणाचे दहन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
तर गावातील जिजाऊ चौकामध्ये रावण पूजनाची परवानगी द्यावी अशी मागणी आदिवासी समाज बांधवांतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार संध्याकाळी या ठिकाणी रावणाची पूजा करून दसरा साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी बांधव इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच शांततेत आणि उत्साहात मारेेगावात हा सण साजरा करण्यात आला.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हि़डीओ….