विवेक तोटेवार, वणी: कापसावरील बोंड अळीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झालेले आहे. सरकारने त्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वे करून त्याचा अहवाल मागवण्यात आले होते. त्यानुसार शेतक-यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. मात्र वणीतील एका शेतक-याचे अनुदान केवळ तलाठ्याने टाळाटाळ केल्यामुळे रोखले गेले आहे. याबाबत त्यांनी तहसिलदारांकडे तक्रार केली आहे.
गुलाबराव डफ यांचे वणी लगत बायपास जवळ शेत आहे. त्यांच्या शेतातील पिकाचे बोंड अळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे झालेली नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी अर्ज केला. तसेच आवश्यक ते कागदपत्रे आणि बँकेचा अकाउंट नंबर तलाठी एस पी पाटील यांच्याकडे दिला. मात्र त्यांनी तो पुढील कार्यवाहीसाठी पुढे पाठवला नाही. त्यामुळे त्यांच्यावर अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
याबाबत त्यांनी तलाठ्यांना वेळोवेळी विचारणा केली असता. त्यांनी दर वेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच अनेकदा ते मद्यप्राशन करून उद्धट भाषेत बोलत असल्याचा आरोपही डफ यांनी तक्रारीत केला आहे.
सततची नापिकी, कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दु्ष्काळ, गारपीट याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत प्रशासकीय कर्मचा-यांनी सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे असताना हेच लोक शेतक-यांना त्रास देताना दिसत आहे. त्यामुळे यावर आता प्रशासकीय अधिकारी काय कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.