दोन महिन्यांपासून डॉक्टर नाही, ३१ ला ताला ठोको आंदोलनाचा इशारा
बहुगुणी डेस्क, राजूर: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला मुख्यालय सोडून मार्डी येथे डेप्युटेशनवर पाठविले. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून येथे डॉक्टरच नाही. ताबडतोब डॉक्टरची जागा भरण्यात यावी, ही मागणी केल्यावरही व तसे मागणीचे व ताला ठोको आंदोलनाचा इशारा देऊनही संबंधित विभागाकडून काहीच कारवाई न केल्याने शेवटी गावातील पक्ष व संघटनांकडून ३१ ऑक्टोबरला ताला ठोको आंदोलन करण्याचा निर्णय घेऊन तशी सूचना करणारे निवेदन जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
येथील प्रा आ केंद्रात दोन डॉक्टरच्या जागा आहेत. परंतु मागील अनेक काळापासून इथे एकच डॉक्टर असून नवीनच रुजू झालेल्या डॉ अस्वले यांची स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत बिनसल्यामुळे त्यांना इथून मार्डी येथे डेप्युटेशन वर पाठविले आहे. परिणामी इथे डॉक्टरच नसल्याने येथील आरोग्य व्यवस्था डबघाईस आली. सध्या डेंग्यूचे रुग्ण गावात आढळल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. या अनुषंगाने येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस पक्ष, मनसे, बसपा, राजूर विकास संघर्ष समिती व ग्राम विकास समिती,बिरसा ब्रिगेड आदींनी संयुक्तपणे दि १६ ऑक्टो ला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन त्वरित डॉक्टरची नियुक्त करावी अन्यथा प्रा आ केंद्राला कुलूप लावण्यात येईल अशा इशारा देण्यात आला होता. १० दिवसाचा अवधी दिला होता. परंतु संबंधित अधिकाऱ्याकडून काहीच करण्यात आली नाही.
परिणामी येथील पक्ष व संघटनांनी दि ३१ ऑक्टो. ला संयुक्त पणे ताला ठोको आंदोलन करण्याचे ठरविले असून तसे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर श्रीनिवास अंधेवार, कॉ कुमार मोहरमपुरी, माजी पं स सदस्य वसुंधरताई गजभिये, डेव्हिड पेरकावार, प्रवीण खानझोडे, जयंत कोयरे, नंदकिशोर लोहकरे, अनिल डवरे, महेश लिपटे, प्रदीप बांदूरकर आदी लोकांच्या सह्या आहेत.