हिवरीचा 12 वर्षांचा बालक डेंग्यूने दगावला
नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील हिवरी येथील एका 12 वर्षीय बालकाचा डेंगू आजारने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली. गौरव प्रशांत काकड़े असे मृत्यु झालेल्या बालकाचे नाव आहे. याच परिवारातील तीन बालकेसुद्धा डेंगू आजाराचा नागपुर व चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे उघडकीस आले आहे.
आदिवासी बहुल मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील प्रशांत बीजाराम काकड़े यांचा 12 वर्षीय गौरव हा डेंगू आजराने दगावला. मोठा मुलगा यश हा चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तसेच याच कुटुंबातील वैभवी महादेव काकड़े (8), तन्वी पदमाकर काकड़े (10)हे सुद्धा नागपूर येथे उपचार घेत असून जवळपास हिवरी येथील 20 रुग्ण ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे वेळेवर उपचार होत नसल्याने ग्रामीण रुग्णालयाला पाठ दाखवून खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे उघडकीस आले आहे.
ग्रामीण भागातील ग्राम पंचायत स्तरावर होणारी स्वछता फेल ठरत असल्याने गावातील नाल्या,कचऱ्यांचे ढिगार, सांडपाणी, खुल्यात शौच करणे आदी बाबींवर शासन लाखो रूपये खर्च करुन केवळ कागदोपत्री स्वछता अभियान दाखवून ग्राम पंचायत, नगरपंचायतचे स्वच्छतेवर दुर्लक्ष करीत असल्याने डेंगु आजाराला निमंत्रण मिळत आहे.
मारेगाव नगरपंचायत, ग्राम पंचायत अंतर्गत डेंगूला नष्ट करण्यासाठी शासन फॉग मशीनवर लाखो रूपये खर्च करीत आहे. मात्र तालुक्यातील अनेक गावात फॉग मशीनचा वापर होत नसल्याने अनेक ठिकाणी त्या नादुरुस्त अवस्थेत शोभेची वस्तू ठरत आहे.
ग्रा.रु.मारेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.एच.राठोड म्हणतात –
सर्दी, खोकला, डोके दुखी,अंग दुखणे, ताप येणे हे डेंगू आजाराचे लक्षणे होत. अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांनी उपचार घ्यावा तसेच ग्राम पंचायत, नगरपंचायतेनी गावातील नाल्यांची साफ सफाई करुन फॉग मशीनचा वापर करावा जेणेकरून डेंगू आजाराला आळा बसेल.