सावंगी येथे ग्रामस्वच्छतेने दिवाळी साजरी

0

विलास ताजने, मेंढोली : वणी तालुक्यातील सावंगी (लहान) येथे स्वच्छतेबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छता करून दिवाळी साजरी केली. यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला.

गावाच्या विकासात सर्वात मोठा अडथळा अस्वच्छतेने निर्माण होतो. अस्वच्छतेबरोबर माणसांची मनही मलीन होतात. त्यामुळे गावाचा विकास खुंटतो. म्हणून गावातील सर्वांनी स्वच्छ, शिस्तबद्ध होऊन परस्परांशी प्रेमाच्या, सहकार्याच्या भावनेने वागल्यास गावाच्या विकासात हातभार लागतो. या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन सावंगी ग्रामस्थांनी गावाच्या विकासाचा चंग बांधला.

अशा विधायक कार्याची सुरुवात दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरू केली. यासाठी तरुणांनी पुढाकार घेत कार्याला प्रारंभ केला. गावातील सर्व रस्ते झाडून स्वच्छ केली. पदावली भजन, गुरुदेव सेवा भजन मंडळ द्वारा गावात भजन दिंडी काढली. यावेळी लहान मुली, आया बायांनी अंगणात, रस्त्यावर रांगोळी काढून रस्त्यांच्या सौंदर्यात भर घातली. याकरिता सर्व गावकरी आपले हेवेदावे विसरून एकत्र आले. याप्रसंगी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. याकार्याकरिता गावातील सर्वांनी सहकार्य केले.

पुढल्या वर्षी करणार एकत्र लक्ष्मीपूजन

” गावाचे एकचि असावे लक्ष्मीपूजन l प्रचंड मंडपी करोनि स्नान l
सर्वांस ध्यावे फराळ, भोजन l सर्वांमिळोनि l “

असा संदेश तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतून दिला आहे. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराप्रमाणे आम्ही पुढील वर्षी सर्व सावंगीवासी एकत्र येऊन हनुमान मंदिर परिसरात दिवाळीचा सण साजरा करणार आहोत. असे वणीबहुगुणीसोबत बोलताना उमेश ढवस, मिलिंद ढवस यांनी सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.