मयुर गायकवाड, पुणे: एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४ वर्षांपूर्वी बलात्कार झाला होता. धक्कादायक म्हणजे त्या मुलीला एचआयव्हीची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. किडनीचा त्रास होत असल्यानं ती डॉक्टरांकडे गेली होती. तिची चौकशी केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आलं. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सध्या तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शहादत्त शेख (वय १८, रा. कात्रज) याला अटक करण्यात आली आहे. तर, त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिती मुलगी चार वर्षांपूर्वी ११ वर्षांची होती. तिचे वडील मोलमजुरी करतात. तर, याच परिसरात आरोपी समीर शेख व त्याच्या अल्पवयीन साथीदार राहतात. पीडित मुलगी शाळेत होती. अधून-मधून ती शाळा बुडवून घरी थांबत होती. त्यावेळी आरोपी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरी जात होते. त्यानंतर घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत होते. पीडित मुलगी त्यांना नकार देत असे, मात्र आरोपी तिच्यासोबत जबरदस्ती करत होते.
दरम्यान, गेल्या महिन्यात पीडित मुलीचे पाय तसेच पोट सुजल्याने पालकांनी तिला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र उपचारानंतरही पुन्हा तिला त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी पीडित मुलीला ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. ससून रुग्णालयात तिची तपासणी करण्यात आली असता तिला किडनीचा आजार असल्याचे लक्षात आले. त्याचवेळी डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी पिडीत मुलीची एचआयव्ही चाचणी केली. त्यात तिला एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक बाबही समोर आली.
(हे पण वाचा: शेलू येथील विवाहितेचा विनयभंग, आरोपीविरोधात गुन्हा दाखल)
डॉक्टरांनी मुलीच्या आई-वडिलांकडे विचारपूस करून त्यांची एचआयव्ही चाचणी केली. मात्र, त्यांना एचआयव्ही नसल्याचे आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनीच पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी तिने घराशेजारी राहणारा समीर व त्याचा साथीदार घरी कोणी नसताना पाणी पिण्याच्या बहाण्याने येतात. तसेच, माझ्यासोबत अश्लीतल चाळे करत असल्याचे डॉक्टरांना सांगितले.
दरम्यान, हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयाने पोलिसांना खबर दिल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.