पंचशील नगर येथे दुकानाला भीषण आग, माल व दुकान खाक

रात्रीची घटना, लाखोंचा माल आगीत भस्मसात

निकेश जिलठे, वणी: शहरातील पंचशील नगर येथे एका दुकानाला भीषण आग लागली. रात्री 11.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दुकानातील लाखोंचा माल जळून खाक झाला. दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली.

सविस्तर वृत्त असे की शाहबाज अहेमद (33) रा. पंचशील नगर वणी यांचे घराशेजारीच नसिम टेक्सटाईल्स नामक कपड्याचे रिटेल आणि होलसेलचे दुकान आहे. बेडशीट, चादर, ब्लँकेट, सोफा कव्हर यासह जिन्स टिशर्ट इत्यादी कपडे विक्रीचा व्यवसाय ते करतात. शुक्रवारी दिनांक 12 जानेवारीला ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. रात्री 11.45 वाजताच्या सुमारास दुकानाने पेट घेतल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी फोन करून शाहबाज यांना दुकानाला आग लागल्याची माहिती दिली.

आगीचे रौद्र रुप बघून काहींनी तातडीने फायर ब्रिगेडला कॉल केला. आग लागल्याचे कळताच परिसरातील शेकडो लोकांचा जत्था घटनास्थळी गोळा झाला. फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साधनाने पाणी आणून मदत केली. अखेर दीड ते दोन तासांनी आग विझवण्यात यश आले. या आगीत शाहबाज यांचे संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या दुकानात सुमारे 20 ते 25 लाखांचा माल असल्याची माहिती शाहबाज यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली. दुकान आणि माल दोन्हीही या आगीत भस्म झाले. 

आगीची माहिती मिळताच पोलीस दल देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. माहिती मिळताच फायर ब्रिगेड तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने आग आजूबाजूच्या घरात पसरली नाही. फायर ब्रिगेड चालक देविदास जाधव, फायर फायटर सौरभ पानघाटे, फायर फायटर दीपक वाघमारे यांनी आग आटोक्यात आणली.

सुपरहिरो सिनेमा हनुमान शुक्रवारपासून सुजाता थिएटरमध्ये

 

Comments are closed.