मोर्चाने दणाणली वणी, विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

स्पर्धा परीक्षेत ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याची मागणी

विवेक तोटेवार, वणी: स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन परीक्षेत प्रचंड घोळ असल्याने ही पद्धत रद्द करून सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी करत गुरुवारी शेकडो परीक्षार्थींनी वणीत मोर्चा काढला. पाण्याच्या टाकीजवळून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी राज्य सरकारचा निषेध केला. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा खूप मोठा विद्यार्थी वर्ग आहे. पण सद्यस्थितीत स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मोठा घोळ सुरू असल्याचा आरोपी परीक्षार्थीनी निवेदनातून केला आहे. टीसीएस व आयबीपीएसमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील सामान्यीकरण प्रक्रियेमुळे गुणदानात प्रचंड घोळ होत आहे. सोबतच पेपरफुटीची अनेक प्रकरणे उजेडात येत आहेत.

या सर्व बाबी लक्षात घेता, या सर्व स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने न घेता ऑफलाइन पद्धतीने एकाच दिवशी घेण्यात याव्या व स्पर्धा परीक्षा घेण्याची जबाबदारी टीसीएस व आयबीपीएसकडून काढून घेण्यात यावी, सर्व सरळसेवा, स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्या, अशी मागणी परीक्षार्थीनी निवेदनातून केली आहे.

अलीकडेच घेण्यात आलेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेत २०० गुण ठेवण्यात आले होते. मात्र प्रश्नपत्रिका तपासणीनंतर काही विद्यार्थ्यांना २०० पेक्षा अधिक गुण देण्यात आले. या परीक्षेत अनेक ठिकाणी गैरव्यवहार झाल्याच्या बाबीही उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी व ही भरती रद्द करून नव्याने भरती घेण्यात यावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी निवेदनातून करण्यात आली.

पेपरफुटीसंदर्भात कठोर कायदा करून त्या कायद्यानुसार दोषींवर कडक कारवाईची तरतूद करण्यात यावी, असे केल्यास स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकाराला आळा घालणे सोयीचे होणार आहे. रखडलेली पोलिस भरती तात्काळ घेण्यात यावी शिक्षक भरती तात्काळ करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून केली. हे निवेदन एसडीओंमार्फत पाठविण्यात आले. स्वयंस्फूर्तीने काढण्यात आलेल्या या मोर्चात वणी उपविभागातील ग्रामीण भागातील परीक्षार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सुपरहिरो सिनेमा हनुमान शुक्रवारपासून सुजाता थिएटरमध्ये

Comments are closed.