कायर येथे घराला भीषण आग, संपूर्ण घरासह घरातील सर्व वस्तू आगीच्या भक्षस्थानी
जितेंद्र कोठारी, वणी: कायर येथे एका घराला भीषण आग लागली. आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही आग इतकी भीषण होती की यात घराच्या चारही खोल्यांसह घरातील एकही वस्तू शिल्लक राहिली नसल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे. सुरुवातीला गावक-यांनी आणि त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. आगीत कोरांगे कुटुंबीयांचे सुमारे 3 लाख ते 4 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात सुमारे 15 क्विंटल कापसाचाही समावेश आहे.
सविस्तर वृत्त असे की मयूर शंकर कोरांगे (27) हे कायर येथील रहिवासी आहेत. ते पत्नी, मुलगा व मेव्हण्यासह बाजार रोडवरील मध्यवर्ती बँकेजवळील एका 4 खोल्यांच्या माती आणि टिनाच्या घरात राहतात. मयूर कोरांगे हा अडेगाव येथील एका कंपनीत कामाला आहे. त्यांची सकाळची शिफ्ट असल्याने सकाळी 6 वाजता डब्बा घेऊन ते ड्युटीला निघून गेले. दुपारी 11.45 ते 12 वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी प्रिया ही खोलीत लेटून होती, तर त्यांचा 3.5 वर्षांचा चिमुकला मुलगा समोरच्या खोलीत खेळत होता. तर मेव्हणा शुभम हा अपंग असल्याने तो घराबाहेर व्हिलचेअरवर होता.
दरम्यान प्रिया यांना जळल्याचा वास आल्याने त्या उठल्या असता त्यांना किचन व मागील खोलीतून आगीचा लोंढा दिसला. त्या घाबरून तात्काळ मुलाला उचलून घराबाहेर आल्या व त्यांनी आग लागली अशी आरडा ओरड केली. प्रिया यांच्या ओरडण्यामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी आले. आगीची माहिती तात्काळ सरपंचानाही देण्यात आली. नागरिकांनी तात्काळ मिळेल ते साधन घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. सरपंचानी तात्काळ गावातील एक टँकर बोलवून आग विझवण्यासाठी बोलावला.
मात्र आग आटोक्यात येत नव्हती. काही वेळातच वणीहून अग्नीशमन दलाची गाडी देखील पोहोचली. अग्नीशामन दलाने काही वेळातच आग विझवली. मात्र तो पर्यंत संपूर्ण घर बेचिराख झाले. घरात कापूस ठेवून असल्याने आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केल्याचे बोलले जात आहे.
घरातील एकही वस्तू उरली नाही
आगीत कोरांगे यांच्या घरातील 15 क्विंटल कापूस, आलमारी व आलमारीतील रोख 20 हजारांची रक्कम, टीव्ही, शाळेचे व शासकीय कागदपत्रे, दोन क्विंटल गहू, एक क्विंटल तांदूळ, तेलाचे दोन पीपे, कुलर, बेड, टेबल, खुर्ची, घरातील संपूर्ण भांडे इत्यादी जळून खाक झाले. ही आग इतकी भीषण होती की यात घरातील एकही वस्तू शिल्लक राहिली नसल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. आगीत कोरांगे कुटुंबीयांचे सुमारे 3 ते 4 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अपंग मेव्हण्यासह संपूर्ण कुटुंब रस्त्यावर
मयूर कोरांगे त्यांचा मेव्हणा शुभम मडावी हा अपंग आहे. अपंग असल्याने मेव्हण्याच्या घरीच मयूर कोरांगे आपल्या कुटुंबासह राहायचा. संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आल्याने अपंग शुभमसह संपूर्ण कोरांगे कुटुंब रस्त्यावर आले आहे. त्यांच्यासमोर आता जगावं कसा अशा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना तातडीने प्रशासनातर्फे मदत द्यावी अशी मागणी गावकरी करीत आहे. तसेच ग्रामपंचायतीतर्फे त्यांना शक्य तेवढी मदत दिली जाईल अशी माहिती कायरचे सरपंच नागेश धानकसार यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे देखील वाचा:
लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीची फसवणूक, प्रेयसीने प्राशन केले विष
पुण्याहून आईवडिलांच्या भेटीला गावी आलेल्या होतकरू तरुणाची आत्महत्या
अबब…! वणीत शासकीय कार्यालयांसह धनदांडग्यांवर 5.5 कोटींचा मालमत्ता कर थकीत
Comments are closed.