पुण्याहून आईवडिलांच्या भेटीला गावी आलेल्या होतकरू तरुणाची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तो आई वडिलांच्या भेटीसाठी पुण्याहून गावी आला होता. शुक्रवारी तो पुण्याला परत जाणार होता. मुलगा परत जाणार म्हणून आई मुलासाठी डब्बा बनवण्याच्या गडबडीत होती. मात्र मुलाच्या मनात काही वेगळेच होते. त्याने संधी साधत घरी विषारी द्रव्य प्रशान केले. त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. मात्र आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. मारेगाव तालुक्यातील मुकटा येथे ही घटना घडली असून प्रफुल्ल उत्तम तुराणकर (28) असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्रफुल्ल हा मुकटा येथील रहिवासी होता. तो अविवाहित होता. त्याच्या घरी चार एकर शेती आहे. तीन भाऊ व वडिल अशा चार जणांमध्ये ही चार एकर शेती वाहली जायची. त्यामुळे त्यांच्या घरातील परिस्थिती बेताचीच होती. घरच्या शेतीत वडिल व भावाच्या कुटुंबाचे भागत नसल्याने प्रफुल्ल हा नोकरीसाठी बाहेर पडला होता. सध्या तो पुणे येथील बजाज कंपनीत नोकरी करीत होता. काही दिवसांआधीच तो घरच्यांच्या भेटीसाठी मुक्टा येथे आला होता.

शुक्रवारी दिनांक 26 मे रोजी संध्याकाळी तो पुण्याला परत जाणार होता. त्यामुळे 4.45 वाजताच्या सुमारास प्रफुल्लची आई त्याच्यासाठी डब्बा बनवत होती. त्या वेळी त्याचे वडील जनावरांना चारापाणी करायला गेलेले होते. ही संधी साधत प्रफुल्लने घरी असलेली विषारी औषधी घेतली. औषध घेतल्यावर त्याला ओकारी झाली. त्यामुळे मुलाने विष प्रशान केल्याचे आईच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ प्रफुल्लच्या वडिलांना बोलावून घेतले.

प्रफुल्लला चंद्रपूर येथील खासगी दवाखान्यात भरती केले. त्याच्यावर शुक्रवारी संध्याकाळपासून उपचार सुरू होता. मात्र चंद्रपूर येथे आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास प्रफुलची प्राणज्योत मालवली. प्रफुलच्या मागे आईवडील, दोन भाऊ आणि आप्तपरिवार आहे.

प्रफुल्लच्या आत्महत्येने समाजमन सुन्न
प्रफुल्ल हा हळव्या स्वभावाचा होता. तो घरी तीन भावंडांमध्ये सर्वात धाकटा होता. घरी अवघी 4 एकर शेती होती. त्यात तीन कुटुंबाचे भागत नव्हते. त्यामुळे त्याने नोकरी करण्याचा निश्चय करत पुणे गाठले होते. घरची बेताची परिस्थिती असल्याने वडील कायम चिंतेत असायचे. याचे त्याला दु:ख होते. घरच्या परिस्थितीमुळे गेल्या काही काळापासून तो विमनस्क अवस्थेत असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

हे देखील वाचा: 

लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीची फसवणूक, प्रेयसीने प्राशन केले विष

अबब…! वणीत शासकीय कार्यालयांसह धनदांडग्यांवर 5.5 कोटींचा मालमत्ता कर थकीत

सकाळी 10 वाजताचा शो फक्त 80 रुपयांमध्ये, सुजाता थिएटरची नवीन ऑफर

Comments are closed.