जिंदगीला “आसॉं” करूया…. सुनील इंदुवामन ठाकरे

0

God, grant me the serenity to accept the things I cannot change,

Courage to change the things I can,

And wisdom to know the difference.

‘देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे, जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हास लाभू दे आणि दोघांतील फरक जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. Serenity Prayer चा हा भावानुवाद. चित्तशांतीची प्रार्थनादेखील असं हिला म्हटलं जातं. मागे मी गालीबच्या ‘माफीतंत्रा’वर चर्चा केली होती. आता मी देव मानतो की नाही हा प्रश्न इथे येत नाही. ती प्रार्थना अनेक  वर्षांपूर्वी भारताबाहेर लिहिली गेली आहे. पण जगणं सुंदर व सुकर करण्यासाठी हा एक महामंत्र ठरतो. तुम्ही जर कोणत्या उच्च शक्तीला मानत असाल. श्रद्धा ठेवत असाल तर उत्तमच. नसाल मानत किंवा नसेल कुणावर अथवा कशावर श्रद्धा तरीदेखील उत्तमच. कारण ही प्रार्थना आपल्याला जगण्याचा सुंदर मार्ग देते. अनेक महामानवांनी आपल्या अनुभवातून, चिंतनातून मानवी जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक औषध म्हणूनदेखील ही प्रार्थना आपल्याला जगण्याचे बळ देते. माझातरी असा अनुभव आहे.

 

मानवी देह धारण केला की, त्यासोबतच त्या देहबुद्धीचे सारेच गुणदोष येतात. मराठीत षड्विकार म्हणजेच सहा दोष सांगितले आहेत. तर इंग्रजीत सात पातके सांगितली आहेत. या दोन्ही परंपरेत ‘अहंकार’ हा कॉमन आहे. या अहंकारातून आपण अनेक दुःखांना बाळगत असतो. कुरवाळत असतो. पाळत असतो. हा अहंकार येतो अपेक्षेतून. या प्रार्थनेच्या पहिल्याच ओळीत ‘स्वीकार’ हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. स्वीकार केले की प्रयत्नवाद संपतो असे नव्हे, तर ही पहिली पायरी आहे. आपण खरंच सर्वकाही सहज स्वीकार करतो का हादेखील एक वेगळाच मुद्दा आहे. आपण नेहमी आपल्या सोयीनुसार हवे ते स्वीकारतो. आपल्या मनाप्रमाणे झाले नाही तर मग आपला उच्छाद व वैताग सुरू होेतो. हे स्वीकारणं भौतिक व अभौतिक पातळीवर तेवढ्याच सम्यक बुद्धीने, जाणिवेनं होणे आवश्यक असतं.

 

प्रार्थना सांगते की ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्यांचा स्वीकार करावा. बरेचदा म्हणा किंवा नेहमीच म्हणा, ‘मी’ नेहमी जगच बदलवण्याच्या भानगडीत असतो. शेजारी, बायको-नवरा, बॉस, सहकारी अशा अनेक लोकांना बदलवण्याच्या खटाटोपात असतो. ते आपल्यासोबत आपल्याला हवे तसेच व नेहमीच वागतील असे काही बंधनकारक नसते. प्रत्येकाचा स्वभाव, परिस्थिती, वैचारिक व भावनिक पातळी असे अनेक घटक वेगवेगळे असतात. जर कुणी आपल्याला अपेक्षित वागलं नाही तर आपण त्याला तिथेच ‘प्रशिक्षण’ देणे सुरू करतो. जर ती व्यक्ती पद वा प्रतिष्ठेने मोठी असेल तर तिच्याबद्दल चर्चा करत बसतो. काहीकाळी किंवा दीर्घकाळ कुणाचा अभ्यास केला अथवा झाल्यावर लक्षात येतं की ह्या व्यक्तीची ही वागण्याची सवय मी बदलू शकत नाही. आपले श्रम, वेळ व मानसिकता यांच्या इथे अपव्यय करण्यात अर्थ नाही. त्यामुळे आपली प्रज्ञा स्थिर ठेवून आपण याचा स्वीकार केला की जिवाचा वैताग कमी होतो किंवा होत नाही. आता स्वीकार करायचं म्हटलं तर सगळंच स्वीकार करा असा त्याचा अर्थ होत नाही. आपण प्रयत्नवादी असलोच पाहिजे.

 

विषय बदलाचा आहे. प्रार्थनेत धाडस, धैर्य हा शब्द जाणिवपूर्वक वापरला आहे. कारण इथे ज्या गोष्टी ‘मी’ बदलू शकतो त्या बदलण्याचे धाडस, धैर्य मागत आहे. बदलायचं कुणाला? तर इथे स्वतःला बदलायचं आहे. स्वतःला बदलवणं, स्वतःवर प्रयोग करणं फार धाडसाचं काम आहे. आपल्याला ज्ञात असलेले महात्मा गांधी व अनेक महामानवांनी असे अनेक प्रयोग स्वतःवर केलेत. माझ्या ज्या वाईट सवयी आहेत, त्या मी बदलू शकतो. समजा माझ्या नियमित संपर्कातील कुणी नेहमी चिडून, ओरडून माझ्याशी बोलत असेल, तर मी त्या व्यक्तीला वर सांगितल्याप्रमाणे आहे तशी स्वीकार करू शकतो. कारण तो त्या व्यक्तीचा स्वभाव अथवा शैलीच असेल असं आपल्या लक्षात येईल. काही नाती अशीच असतात. जन्मदाते-अपत्य, प्रामाणिक गुरू-शिष्य, नवरा-बायको अशा नात्यांत अहंकार पूर्णच बाजूला ठेवावा लागतो. मी अशा या वागण्याला खूपच ‘रिअॅक्ट’ न होता शांतपणे समजून घेतलं तर बरेच प्रश्न सहज सुटतील. किंबहुना ते निर्माणच होणार नाहीत. या प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःलाच बदलणे केव्हाही योग्य. आयुष्य खूप सुंदर होत जातं.

 

अनेकांच्या कौटुंबिक आयुष्यात मतभेदांची दरी निर्माण होते. त्यातील एक मुख्य कारण असतं ते एकमेकांना बदलवण्याचे अफाट प्रयोग. संत चोखोबांनी म्हटलंच आहे, ‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा’; अर्थात ऊस वाकडातिकडा असला तरी त्याचा रस हा वाकडा नसतो, तो गोडच असतो. अशीही काही वल्ली जगात असतात. आहेतच. त्यांचा ‘डोंगा’ स्वभाव आपण त्यांच्यातील आत्मरसाच्या गोडव्याची जाणीव ठेवून गोड करून घेण्यास काय हरकत आहे. ‘स्माईल’ हे अनेक समस्यांवरचे जालीम औषध आहे. आपल्याला न आवडणारी गोष्ट जर एखादी व्यक्ती वारंवार करत असेल तर हे औषध वापरून पाहा. त्याचा उपयोग होतोच. मेंढपाळ आपण बघा. तो रानात सर्व शेळ्यांना मोकळे सोडतो. शेळ्या छान त्यांच्या आवडीने चरतात. मेंढपाळ आपल्या शेळ्यांची मान पकडून कोणत्या विशिष्ट फांदीजवळ नेऊन ‘तू हा पाला खा, तू तो पाला खा’ असे म्हणत नाही. तो निवांतपणे हातात काठी घेऊन सर्व काही पाहत असतो. याचा अर्थ असा नव्हे की तो दुर्लक्ष करतोय. एखादी शेळी जर कळप सोडून भलतीकडेच जात असेल तर तो मोठ्याने आवाज देऊन अथवा काठीचा वापर करून थोडासा सक्रिय होऊन तिला कळपात परत आणतो. आपणही अनेक छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्षच केलेले बरे. जर परिस्थिती हाताबाहेरच जात असेल तर त्याला सद्सद्विवेकाचा वापर करून जाग्यावर आणलेच पाहिजे.

 

आपल्याला बदलता येण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपला स्वभाव, आपली वागणूक व आपल्या बऱ्याच गोष्टी. तर सुरूवात आपण स्वतःपासूनच केली पाहिजे. आता प्रार्थनेतला अंतिम घटकदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे. अमुक अमुक गोष्टींचा स्वीकार करावा आणि अमुक अमुक गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत असं म्हटलं आहे. मग यातील कोणत्या गोष्टींचा स्वीकार करावा व कोणत्या गोष्टी बदलवाव्यात ह्याचा विचार सद्सद्विवेकबुद्धीने व्हायला हवा. याचा अर्थ असा की आपल्याला तो निर्णय घेता आला पाहिजे की, मी या गोष्टी बदलवू शकत नाही. या गोष्टींचा मला स्वीकार करणेच योग्य राहील. तसे करणे हिताचे राहील. सर्वकाही निसर्गनियमाने होतच आहे. आहे तसेच चालू द्या असा त्याचा अर्थ होत नाही. तसेच आपण काय काय बदलवू शकतो तेदेखील अशाच सद्सद्विवेकाने ठरवले पाहिजे.

 

‘स्वीकार’ म्हणजे काहीच बदल न घडवून आणणे आणि ‘बदल’ म्हणजे सर्वच बदलवायला निघणे अशी अतिरेकी भूमिका घेणे कधीच योग्य नाही. मला यातील फरक कळला पाहिजे, की मी काय बदलू वा बदलवू शकतो व मी काय स्वीकार केले पाहिजे. जग प्रेमाने जिंकता येतं. चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेमच पुरे आहे. वाईट गोष्ट करण्यासाठी खूप खटाटोप, भानगडी कराव्या लागतात. प्रार्थनेचे तिन्ही घटक महत्त्वाचे आहेत. जगण्याची त्रिसूत्रीच आहे ती. ‘स्माईल’सारखे औषध व शस्त्र जगात कुठेच नाही. त्याच्या भरवशावर जग जिंकता येतं. चला तर मग जग जिंकुया. ‘स्माईल प्लीज!’

सुनील इंदुवामन ठाकरे

8623053787

9049337606

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.