बहुगुणी डेस्क, वणी: सद्गुरु श्री जगन्नाथ महाराज यांची पालखी आज मंगळवारी सकाळी आषाढी वारीसाठी प्रस्थान करणार आहे. एक महिना प्रवास करून ही पालखी आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. मंगळवारी दुपारी 1.16 वाजता पालखी नंदेश्वर देवस्थान वणी येथून ही पालखी निघणार आहे. चिखलगाव, भांदेवाडा असे मार्गक्रमण करीत गुरुवारी दिनांक 6 जून रोजी वेगाव येथून ही पालखी हजारो भाविकांसह पंढरपूर येथे जाणार आहे. यंदा पालखीचे 30 वे वर्ष आहे. या पालखीत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
डोंगरगाव येथील आनंदराव राजूरकर हे पालखीचे प्रमुख असून चंद्रपूर येथील बाळाभाऊ बोबडे हे या पालखीचे संयोजक आहेत. तर ह.भ.प. केशवानंद चवरे हे भजन प्रमुख आहेत. आमदार संजय देरकर, पांडुरंग सूर्यभान धोबे व प्रकाश लक्ष्मणराव काकडे यांच्या मार्गदर्शनात हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्या गावी पालखीचा मुक्काम राहणार, त्या गावी हरीपाठ, काकडा, किर्तन इत्यादीचे आयोजन करण्यात आले आहे. पालखीत भाविकांसह कीर्तनकार, गायक, विणेकरी, मृदंगवादक, ऑर्गन वादक यांच्यासह चोपदार, आचारी इत्यादी सहभागी होणार आहेत. हातात टाळ चिपळ्या घेऊन, मृदंगाचा निनादाच्या तालावर ताल धरत अखंड जयघोष करत ही पालखी मार्गक्रमण करणार आहे.
मंगळवारी दिनांक 3 जून रोजी घटनस्थापना व अखंड विणा वादनाला प्रारंभ होणार आहे. हभप केशवानंद महाराज चवरे हे श्रीमद भागवत कथा सादर करणार आहेत. वणी, चिखलगाव, भांदेवाडा, वेगाव, मारेगाव, वाई, केळापूर, कुर्ली, दहेली, मालवाडा, हिवरा असा या पालखीचा मार्ग राहणार आहे. यंदा पालखीचे पंढरपूर वारीचे 30 वे वर्ष आहे. या पालखीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष गयाबाई रुधाजी देरकर यांनी केले आहे.
Comments are closed.