फवाद ठरला राजकारणाचा बळी – रणबीर कपूर
फवादला निरर्थकपणे वादात ओढण्यात आल्याची रणबीरची प्रतिक्रिया
मुंबई: सध्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याचा आगामी सिनेमा ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनमध्ये फारच व्यग्र आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तो फवाद खानचा फार मोठा चाहता असल्याचे त्याने स्पष्ट केले. आपण फवाद खानचे प्रशंसक असून, ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान त्याला निरर्थकपणे वादात ओढण्यात आले याचे फार वाईट वाटते, असे मत रणबीरने व्यक्त केले.
रणबीर कपूरने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमातील त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि प्रभाव पाडणारी होती. छोटी भूमिका असतानाही त्याने ती करण्याची तयारी दर्शवली होती हीच मोठी बाब आहे.
राजकीय आंदोलनाची झळ फवाद खानला सोसावी लागणं हे दुर्दैवी आहे. पण तो एक असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे पाहून मी शिकण्याचा प्रयत्न करतो. एक मित्र म्हणूनही माझं त्याच्याशी चांगलं जुळतं. त्याच्यासोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करायला मला आवडेल. माझे आई, वडीलदेखील फवादचे चाहते आहेत. माझी आई त्याचे टिव्ही शोदेखील पाहते. त्याचं ‘कपूर अँण्ड सन्स’ सिनेमातील काम मला आवडलं होतं, असं रणबीरने सांगितलं. ‘ऐ दिल है मुश्किल’ हा रणबीर आणि करण जोहरचा पहिलाच सिनेमा होता. पुन्हा करणसोबत काम करायला आपल्याला आवडेल अशी प्रतिक्रियाही रणबीरने दिली.
फवादने ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी उरी हल्ला झाल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातले संबंध अजून विकोपाला गेले होते. याचा सर्वात मोठा फटका हिंदी सिनेमांना पडला होता. भारतीय सिनेमांमध्ये काम करण्यास पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्यात आली होती. अनेक राजकीय पक्षांनी या सिनेमाला कडाडून विरोध केला होता. अखेर या वादानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून पाकिस्तानात जावे लागले होते.