उष्माघाताचे प्रमाण वाढले, लोकांनी काळजी घ्यावी

डॉ. श्याम जाधव (नाईक) यांचे नागरिकांना आवाहन

0
मानोरा: सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. तापमान 45- 46 डीग्री पर्यंत गेले आहे. आणखी काही दिवस उन्हाचा प्रकोप सुरूच राहील. त्यामुळे शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा उष्माघात होण्याची शक्यता वाढते. जर हे प्रमाण वाढले तर प्रसंगी जीवही जाऊ शकतो. त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन नामवंत डॉ. श्याम जाधव नाईक यांनी केले आहे. यासोबत त्यांनी उष्माघाताचे लक्षण आणि त्यापासून कसा बचाव करावा याचे मार्गदर्शनही केले आहे.
उष्माघात का होतो?
आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे ९८.६ अंशाच्या जवळपास असते. हे तापमान नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. जर तापमान वाढले तर तर शरीराची सर्व यंत्रणा कोलमडते त्यामुळे तब्येत बिघडते. याला आपण उन्ह लागलं म्हणतो. यात मळमळ, उलट्या, डोकेदुखी, फीट येणे, त्वचा गरम व कोरडी होणे, घाम न येणे, श्वासाची गती वाढणे, रक्तदाब कमी होणे, भ्रम होणे व बेशुद्धावस्था येणे. अशी लक्षणं दिसून येतात. जर तापमान १०४पेक्षा अधिक गेलं आणि योग्य तो उपचार घेतला नाही तर व्यक्ती दगाऊ शकतो.
मजूर लोकांना उन्हाळ्यात जास्त काळजी घेणे गरजेचे असते. कारण त्यांचे संपूर्ण कामच उन्हात असते. उन्हात श्रमाची काम केल्यास शरीरातील सोडीयम व क्लोराईडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आजारी पडण्याची भीती असते. अनेकदा लोक कामानिमित्त बाहेर उन्हात निघावं लागतं. जर जास्त वेळ उन्हात राहिल्यास त्या व्यक्तीचे ब्लडप्रेशर कमी होऊन चक्कर येऊ शकते.
अनेकदा उन्हात फिरल्याने थकवा जाणवतो, चक्कर येते व ताप येऊ शकतो. हा ताप साधारणपणे १०२ पेक्षा कमी असतो. शरिरातील पाणी व सोडियमची कमतरता निर्माण झाल्यामुळे हे लक्षणं दिसून येतात.

घरगुती उपाययोजना करून आपण उष्माघातापासून बचाव करू शकतो. शक्यतो दुपारी उन्हात काम करणे व फिरणे टाळावे. बाहेर निघताना डोक्यावर रुमाल, स्कार्फ बांधावा, गॉगलचा वापर करावा. थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहावे. दिवसभरात पाण्याचे अधिकाधिक सेवन करावे. यामुळे शरिराचे तापमान नियंत्रणात राहते. भडक रंग उन्हात लवकर तापतो. त्यामुळे फिक्या रंगाचे व सुती सैल कपडे परिधान करावे.
उन्हात काम केल्यास शरीरातील पाणी व सोडीयमचे प्रमाण कमी होते. परिणामी लघवीचे प्रमाण कमी होते किंवा लघवी जास्त पिवळसर होते. त्यामुळे नारळाचे पाणी, कैरीचे पन्हे, लिंबू सरबत, लस्सी, ताक प्यावे. शिवाय ओआरएस पावडर पाण्यात टाकून घेत राहावा. आहारात टरबूज, खरबूज, लिंबू, कांदा, संत्रे यांचा अधिकाधिक वापर करावा.

शरीरातील पाणी कमी झाल्याने मुतखडा आणि मूळव्याधीचा धोका वाढतो. त्यामुळे फळांचा ज्युस, ताक, लिंबूपाणी याचा वापर करावा. शक्य नसल्यास अधिकाधिक पाण्याचे सेवन करावे. उन्हाचा त्वचेवरही परिणाम होतो. याकाळात घामोळ्या येतात तसेच त्वचाही काळवंडते. अशा वेळी चेहरा पूर्ण झाकावा तसेच दिवसातून दोन वेळा आंघोळ करणे गरजेचे आहे. जंतनाशक द्रव्य टाकून आंघोळ करणे हे तर अधिक उत्तम आहे. उन्हामुळे डोळ्यांची जळजळ होण्याच्या प्रमाणातही वाढ होऊ शकते. त्यामुळे दिवसातून दोन ते तीन वेळा डोळे थंड पाण्याने धुवावे.
उष्माघाताला सहजतेने घेणे चुकीचे आहे. दरवर्षी अनेकांचा उष्माघातामुळे मृत्यू होतो. जर आपण थोडी काळजी घेतल्यास यापासून बचाव करू शकतो. मात्र उष्माघातामुळे प्रकृती अधिक बिघडल्यास त्यावर लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
Comments
Loading...