पावसाळ्यात ताप आला तर काय घ्यावी काळजी ?
पावसाळ्यात आलेल्या तापावर जाणून घ्या काही घरगुती उपाय
पावसाळ्यात सर्वात मोठी समस्या असते ती आरोग्याची. वातावरणात अचानक बदल झाल्यानं अनेकांना ताप, सर्दी, खोकला हे विकार जडतात. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर सर्दी, ताप, खोकला याची पहिली पायरी असेल तर काही घरगुती उपाय देखील करायला हरकत नाही. जर सर्दी, ताप वाढला तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे. पावसाळ्यात जर ताप आला तर काय घरगुती उपाय करावे हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
ताप आल्यास काय करावे उपाय ?
१) तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो
२) तुळस घालून केलेला चहा प्यायल्यानेही ताप लवकर उतरतो.
३) पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो.
४) आल्याचा चहा घेतल्यानेही आराम मिळतो. याने तापासोबत कफही निघून जाईल.
५) थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्लाने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो.
६) जर सर्दी, ताप, थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुक़डा, लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो.
७) कांद्याचा रस घेतल्याने जुनाट ताप देखील कमी होतो.
८) तापात बेलफळाचं चूर्ण उपयुक्त ठरतं. बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून ताप उतरेपर्यंत घ्यावं.
९) तापात मनुके खाणं उपयुक्त ठरतं. २० ते २५ मनुके पाण्यात भिजत घालावेत. ते कुस्करून त्यात लिंबाचा रस घालावा. हे दिवसांतून दोन वेळा घ्यावं.
१०) तापामध्ये भरपूर पाणी पिणं फायदेशीर ठरतं. यासोबत संत्र्यांचा रस घेतल्यानेही आराम मिळतो.
११) आहारात सफरचंद, दूध, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश करावा.
१२) तुळशीचा काढा : कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण 5-10 मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो.
१३) तुळस आणि दूध : तुळशीचं दूध तापावर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. अर्धालीटर पाण्यामध्ये वेलचीची पावडर आणि तुळशीची पानं मिसळा. यामध्ये थोडं दूध आणि साखर मिसळा. हे दूध गरम प्यावे. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.
१४) तुळशीचा रस : तापकमी करण्यासाठी तुळशीचा रसदेखील फायदेशीर ठरतो. लहान मुलांसाठीदेखील हा उपाय सुरक्षित आणि फायदेशीर आहे. 10-15 तुळशीच्या पानांना पाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटावे. 2-3 तासांनी तुळशीचा रस प्यावा. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.