फेक फोटो आणि व्हिडीओ टाकल्याप्रकरणी भाजपच्या आयटी सेलच्या सचिवाला अटक

बंगालमधल्या हिंसाचाराविषयी सोशल मीडियात टाकल्या होत्या फेक पोस्ट

0

कोलकाता: पश्‍चिम बंगालमध्ये हिंसाचाराबाबत सोशल मीडियावरून बनावट व्हिडिओ आणि छायाचित्र पोस्ट केल्याप्रकरणी भाजपचा आयटी विभाग सचिव तरुण सेनगुप्ता याला असंसोल येथून अटक करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ही करवाई केली. ९ जूलैपासून आत्तापयर्ंत याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली ही तिसरी व्यक्ती आहे. सेनगुप्तावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर प्रहार करीत सोशल मीडियातून दिशाभूल करणारी बनावट छायाचित्रे पसरवून भाजपचा जातीय दंगली भडकावण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी भाजपचा सोशल मीडियातून सुरू असलेल्या धुमाकुळाला पश्‍चिम बंगालच्या जनतेने थारा देता कामा नये, असे आवाहन बॅनर्जी यांनी येथे एका जाहीर सभेत बोलताना केले.

दरम्यान, या आठवड्यात दिल्ली भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात याप्रकरणी कोलकात्यात दोन अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आहे आहेत. शर्मा यांनी बसीरतमधील दंगलप्रकरणी राज्य सरकारच्या निषेधासाठी आंदोलनाचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. मात्र, त्यासाठी २00२ मधील गुजरात दंगलीतील जाळपोळीचे छायाचित्र वापरले होते.

दरम्यान, रविवारी कोलकाता पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने बसीरतच्या दंगलप्रकरणी माहिती प्रसारित करताना एका महिलेसोबत गैरवर्तन करणारे छायाचित्र पोस्ट केले होते. हे छायाचित्र एका भोजपुरी सिनेमातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे छायाचित्र अनेक भाजप नेत्यांनी शेअर केले होते. याप्रकरणी बसीरतमध्ये जातीय दंगल कशी भडकली याबाबत चौकशीसाठी कोलकाता उच्च न्यायालयाच्या नवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली न्यायलयीन समिती नेमण्यात आल्याचे ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.